पणजी : पर्यटकांनी किंवा अन्य कुणीही बिकीनी घालून मंदिरे किंवा चर्चमध्ये किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये एवढेच मी यापूर्वी म्हटले होते. माझी ती भूमिका कायम आहे पण काहीजणांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी विषय समजून न घेताच बाऊ केला, असे मगोपचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
बिकीनी घालून कुणीच सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असे सर्वच गोमंतकीयांना वाटते. मंदिरे व चर्चमध्ये तर जाऊच नये अशी सर्वाचीच भूमिका असते. खासगी ठिकाणी कोण काय करतोय हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण सार्वजनिक ठिकाणी तरी बिकीनी घालून प्रवेश नको असे मी म्हटले होते, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. पोर्तुगालच्या पंतप्रधानाबाबतही मी गैरउद्गार काढले नव्हते. मी सालाझारशाहीविरुद्ध बोललो होतो. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काहीजणांनी चुकीच्या पद्धतीने हा विषय घेतला. त्यामुळे मगो पक्षाला सात विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. पोर्तुगीजांनी गोवा सोडून जाताना गोव्यातील पाणी पुरवठा वाहिनी व काही पुल उध्वस्त केले होते. सालाझारशी पोर्तुगालमधील लोकांनाही मान्य नव्हती. पोर्तुगालमध्येही सालाझारशाही नष्ट केली गेली व गोव्यातही तत्पूर्वीच गोमंतकीयांनी ती नष्ट केली. गोमंतकीय लोक स्वाभिमानी आहेत, असे ढवळीकर म्हणाले.
मी स्वत: कायम सालाझारशाहीविरुद्धच असेन. आज देखील कधीही सालाझारशाही जर कुणी सुरू केली तर मी गप्प राहणार नाही, असे ढवळीकर यांनी नमूद केले. मूळ गोमंतकीय व्यक्ती पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी पोहचली याविषयी मलाही अभिमान आहे. मी त्यांचा त्याविषयी सत्कार करतो असेही मी त्यावेळी म्हटले होते. मात्र मी सालाझारशाहीविरुद्ध बोललो होतो व त्याचा चुकीचा अर्थ काही मतदारांनी काढला , असे ढवळीकर म्हणाले.
दरम्यान, मंत्री ढवळीकर हे गेल्या आठवडय़ात पोर्तुगालच्या दौ:यावरून परतले. पोर्तुगालमध्ये उत्तम असे तंत्रज्ञान असून त्याचा लाभ गोमंतकीयांनी आताही घेण्यात काही चुकीचे नाही, असे ढवळीकर म्हणाले.