म्हापसा : नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांचा लोंढा येणार असल्याने पुढील आठवडाभर गोवा पोलिसांची कसोटी लागणार आहे. कायदा व्यवस्था हाताळताना त्यांची दमछाक होणार आहे. खास करुन किनारी भागात वाढती सेक्स रॅकेट प्रकरणे तसेच अमली पदार्थ व्यवहारा निमित्त पोलिसांना दक्ष राहून काम करण्याची गरज आहे.
नाताळ तसेच नववर्ष साजरे करण्यासाठी दरवर्षी गोव्यात येणारे लाखोंनी पर्यटक खा, प्या, मजा करा या उद्देशाने येतात. यंदाही पर्यटक गोव्यात दाखल होऊ लागले आहेत. डिसेंबर महिना लागला की खºयार्थाने पर्यटकांची वर्दळ सुरु होते. त्यांचा रोख फक्त किनारी भागावरच असतो. त्यातून पर्यटकांच्या गर्दीने भरुन गेलेल्या किनारी भागातील पर्यटन व्यवसाय तेजीत चालत असतो. त्यामुळे फक्त किनारी भागातच हे गैरप्रकार वारंवार उघडकीस येतात. अत्यंत छुप्या पद्धतीने हा व्यवसाय होत असतो. आता तर हा व्यवसाय आॅनलाइन पद्धतीने तसेच किनारी भागाजवळील गावात फोफावल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
आलेल्या पर्यटकांना स्वत:कडे आकर्षीत करुन घेण्यासाठी इथल्या व्यावसायिकांकडून अनेक युक्त्या केल्या जातात. त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे मोठ्या संख्येने आयोजित होणाºया पार्ट्या. पर्यटकांनी आपल्याच पार्ट्यांना उपस्थिती लावावी त्यासाठी विविध प्रकारची आमिषे सुद्धा दाखवली जातात. यात मद्य, संगीत रजनीच्या आडून सुरु असलेला वेश्या व्यवसाय तसेच अमली पदार्थांची आमिषे दाखवण्याच्या प्रकारांचा समावेश असतो. देण्यात आलेल्या आमिषांना बळी पडून पर्यटक पार्ट्यांना उपस्थिती लावतात. होत असलेल्या या प्रकारांमुळे अनेक गैरप्रकारही किनारी भागात घडले आहेत.
गोव्यात वारंवार उघडकीस येणारी सेक्स रॅकेटस व अमली पदार्थ पकडण्याचे प्रकार पाहता गोवा हे सेक्स डेस्टीनेशन या नजरेने ओळखले जाण्याची भिती बळावली आहे. किनारी भागात उतरणाºया अधिकतर पर्यटकांकडून याच गोष्टीची विचारणा केली जाते. इथल्या व्यवसायिकांना सुद्धा पर्यटकांना काय हवे याची पुरेपूर जाण असल्याने ‘मागणी तसा पुरवठा’ यानुसार हा गैरधंदा सुरू आहे. त्याला स्थानिकांचा सुद्धा आशिर्वाद लाभलेला असतो.
येणारे बहुतांश पर्यटक गोव्यात नाताळ तसेच नवीन वर्षाचा आनंद लुटण्याच्या निमित्ताने येत असले तरी नाताळ तसेच नवीन वर्षाच्या नावावर गैरप्रकाराकडे त्यांचा कल असतो. त्यांचे लक्ष फक्त अतिमद्य प्राशन करुन दंगामस्ती करणे नाव फक्त डिसेंबर महिना साजरा करण्याचे असते. त्यामुळे त्यांचे ध्येय सुद्धा ठरलेले असते. ठेवलेले ध्येय गाठण्यासाठीच पर्यटक येत असतात.
अशा प्रकारच्या पर्यटकांनामुळे रात्रभर किनारी भागात वर्दळ सुरुच असते. धांगड धिंगाणा घालण्यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या पर्यटकांपासून इतरही पर्यटकांना नाहक त्रास सहन करावे लागतात. त्यातून दंगामस्ती होण्याचे प्रकारही घडत असतात. अशा गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याने पुढील आठवडाभर पोलिसांची खरी कसोटी लागणार आहे.
डिसेंबर महिना लागल्या पासून किनारी भागात पोलिसांनी सेक्स रॅकेट तसेच अमली पदार्थ विकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. सुरु असलेली ही मोहीम पुढील आठवडाभरात आणखीन गतिमान होणार आहे. ही मोहीम गतिमान करताना पोलीस गस्तीत वाढ करण्यात आलेली आहे. किनारी भागातील पोलीस संख्येतही वाढ करण्यात आलेली आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेता नाताळ सण तसेच नवीन वर्ष पोलिसांची दमछाक करणारे ठरणार आहे.