लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्य सरकार पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य गोवा दाखवण्यासाठी आम्ही योजना सुरू केल्या आहेत. समुद्रकिनाऱ्या पलीकडे सुद्धा एक स्वच्छ व सुंदर गोवा आहे. त्याचे आकर्षण पर्यटकांना व्हावे, म्हणून सरकार अंतर्गत पर्यटनाला पूरक साधन सुविधा निर्माण करत आहे. इको टुरिझमच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम अशी पिढी घडत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त, ट्रॅव्हल व टूर असोसिएशन ऑफ गोवाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की पर्यटन क्षेत्रात जे काही मानव संसाधन आमच्याकडे आहे, त्याचा इको टुरिझमसाठी कसा वापर करता येईल, यासाठी आम्ही कार्यक्रम सुरू केले आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक खाद्य संस्कृती, स्थानिक जीवनमान, स्थानिक लोककला याकडे आम्ही पर्यटकांना आकर्षित करणार आहोत. राज्यातील इको टुरिझमच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, याकडे सरकार लक्ष देणार आहे. स्वयंपूर्ण गोवाचे जे ध्येय सरकारने पाहिले आहे, ते पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही साध्य करणार आहोत.
ज्यांच्याकडे नैसर्गिक समृद्धी आहे, त्या लोकांनी इको टुरिझमसाठी आपल्यापरीने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी जे काही सहकार्य हवे आहे ते देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. एका पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता कशी राबवता येईल, यासाठी सरकारमधील प्रत्येक घटक प्रयत्न करत आहे. पर्यटनाच्या भरभरासाठी सरकारची जी काही स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपले संपूर्ण योगदान द्यायला हवे.
साहसी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन , अध्यात्मिक पर्यटन यांसारखे विषय घेऊन आम्ही पर्यटनाला आता वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहोत. यासाठी तुमच्याकडे ज्या काही कल्पना असतील, त्या सत्यात उतरविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत विविध उपक्रमांची माहिती दिली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त, ट्रॅव्हल व टूर असोसिएशन ऑफ गोवातर्फे इतर उपक्रमही आयोजित करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.