लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटीच्या कामांसाठी शहरातील पाच रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. हे रस्ते ९ ते २८ फेब्रुवारी या काळात बंद राहतील, असे स्मार्ट सिटी योजनेच्या वतीने कळविण्यात आले आहेत.
शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेतील अंतिम टप्प्याची कामे सुरू आहेत. तिसऱ्या टप्प्यांतील पायाभूत सुविधांची विकासकामे १,४१५ मीटर क्षेत्रात हाती घेतली जात आहेत. या कामांसाठी मध्यवर्ती परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक २० दिवसांसाठी बंद ठेवली जाईल. पाच रस्ते वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गावरून वळवली जाणार आहे. या काळात नागरिकांनी तसेच शहरात कामानिमित येणाऱ्या लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने केले आहे.
कोणते रस्ते वाहतुकीसाठी होणार बंद
जनरल बेर्नाडो ग्युडिस रोड : गीता बेकरी ते आयनॉक्स (५३५ मीटर)
एमजी रोड : युको बँक ते विनंती हॉटेल (३८० मीटर)
कॉस्ता आल्वारिस रोड : आल्फ्रान प्लाझा ते डी. बी. रोड जंक्शन (२०० मीटर)
टॉम वाइन स्टोअर ते डी. बी. रोड जंक्शन (२०० मीटर)
कॉस्ता आल्वारिस रोडवरील दोन अंतर्गत रस्ते (१०० मीटर)
या मार्गावरून वाहतूक
जनरल बेर्नाडो ग्युडीस रोड वापरणाऱ्यांनी डॉन बॉस्को स्कूलमार्गे स्वामी विवेकानंद रोड आणि एम. जी. रोडने डी. बी. रोडला जावे. एम. जी. रोड वापरणाऱ्यांनी वुडलैंड शोरूमजवळील एम. जी. रोडवर जाण्यासाठी स्वामी विवेकानंद रस्त्याचा वापर करावा.