राजधानी पणजीत केवळ पणजीचेच लोक फिरतात असे नाही. चोवीस तासात काही लाख लोक अन्य भागातूनही पणजीत येऊन जातात. बहुतांश पर्यटकही त्यात असतात. शहरात आज जी वाहतूककोंडी होत आहे, ते गृहखात्याचे आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अपयश आहे. सरकारलाही त्याविषयी थोडा तरी खेद वाटायला हवा. वाहनचालकांना स्वयंशिस्त नाही, त्यामुळे वाहतूककोंडी होते, असे सरकारी यंत्रणेने नमूद करणे हा पणजीवासीयांचा, वाहनचालकांचा अपमान आहे.
दुपारी सर्व विद्यालये सुटतात, शिवाय सरकारी कार्यालयांतील कर्मचारी, खासगी कार्यालयांचा स्टाफ, असे सगळे आपल्या घरी जेवायला जातात. मात्र, यावेळी कुठेच एकही वाहतूक पोलिस उभा नसतो. वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी सकाळी आणि दुपारीही पोलिस पणजी शहरात नसतात. सायंकाळी तर राजधानीतील वाहतूक व्यवस्था रामभरोसेच असते. पणजीतील रस्त्यांची फोडाफोडी अशा पद्धतीने सुरू आहे की, वाहन कसे चालवावे तेच लोकांना कळत नाही. कंत्राटदारांची माणसेही कुठेच उभी राहून वाहतुकीचे व्यवस्थापन करत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री बाबूश मोन्सेरात, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापौर व सर्व संबंधितांनी येत्या आठवड्यात एक दिवस दुपारच्यावेळी आपल्या खासगी गाड्या घेऊन पणजीत फिरावे. वाहन स्वतः चालवावे आणि स्वयंशिस्त दाखवावी. ही माहिती गुप्त ठेवावी. वाहतूक पोलिस विभागालाही कल्पना देऊ नये. पणजीत वाहतुकीचा कसा शिमगा सुरू आहे आणि वाहनचालकांचा, नागरिकांचा, दुकानदारांचा जीव कसा गुदमरतोय, हे मुख्यमंत्र्यांसह सर्वांना कळून येईल.
मोन्सेरात यांनी दोनवेळा विधान केले की, पणजीत सुरू असलेल्या रस्ते खोदाईचा व कामांचा सामान्य लोकांना त्रास होत नाही. अवघेच चार- पाच जण तक्रारी करतात; पण सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे गैरसोय होत नाही. सत्तेत असताना प्रत्येक राजकीय नेत्याला असेच वाटते. स्वयंपाक गॅस सिलिंडरचा दर वाढला तर सामान्य माणसाला त्रास होत नाही, असे काही केंद्रीय नेत्यांना वाटते. पेट्रोल- डिझेल महागले तर मध्यमवर्गीयांना मोठासा त्रास होत नाही, कारण त्यांचे उत्पन्न आता वाढलेय, असाही दावा काही राजकारणी करतात. मोन्सेरात त्याच धर्तीवर पणजीतील सामान्य माणसाविषयी बोलतात. सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर पणजीचे आमदार होते तेव्हा निवडणूक काळात भाजपच्या त्यावेळच्या विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या विषयावरून मोठा वाद निर्माण केला होता. घोटाळ्याचा आरोप करत त्याच मुद्दयावर निवडणूक लढवली होती. आता पणजीत दमदार म्हणता येतील, असे कुणी राजकीय विरोधक राहिलेले नाहीत. मनोहर पर्रीकर आज विरोधी पक्षनेतेपदी असते तर त्यांनी पणजीतील नागरिकांना नेतृत्व देत आंदोलन केले असते. आजचा भाजप पर्रीकरांचा आंदोलनाचा वारसा विसरल्याने पणजीची दुर्दशा झाली आहे. लोक खड्ड्यात पडले, वाहने कलंडली, लोकांचा जीव वाहतूककोंडीत गुदमरला तरी कुणालाच त्याचे वाईट वाटत नाही. कारण काहीही झाले तरी आपल्याला मते मिळतात, यातच सत्ताधारी समाधानी आहेत. पणजीच्या वाट्याला आलेले भोग डोळे मिटून सहन करण्याचे काम राजधानीतील सज्जन करत आहेत.
स्मार्ट सिटीची कामे करताना नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाता आले असते. एका भागातील काम अगोदर पूर्ण करून नंतर दुसऱ्या भागात काम करून लोकांना व दुकानदारांना दिलासा देता आला असता. पणजीत जणू काही मायनिंग सुरू असल्याप्रमाणे सगळीकडे धूळच धूळ दिसतेय. घरांमध्ये, दुकानात, छोट्या हॉटेलांत, नाका-तोंडात धूळ जाते. फक्त कसिनो जहाजांमध्ये आणि पर्वरीच्या मंत्रालयातही धूळ नाही. त्यामुळे सरकारला वाटतेय की, सामान्य माणसाला काहीच त्रास होत नाही. जे पदपथ पाच वर्षांपूर्वी बांधले, जे रस्ते पाच वर्षांपूर्वी दुरुस्त केले होते, ते पुन्हा फोडले आहेत. महिनाअखेरीस अनेक कामे पणजीत पूर्ण होतील, असा दावा सरकार करते. मात्र, सद्यस्थिती पाहता काम पूर्ण होईल, असे वाटत नाही. जूनमध्ये पाऊस सुरू झाला की, पणजी खरोखर स्मार्ट झालीय की पणजीचेच रूपांतर महामांडवीत झालेय ते कळून येईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"