केपे : जोपर्यंत खनिज वाहतुकीसाठी बगल मार्ग तयार करण्यात येत नाही, तोपर्यंत केपे, तिळामळ, कुडचडे या मुख्य मार्गावरून खनिज वाहतूक रोखून धरण्याचा इशारा मंगळवारी स्थानिक नागरिकांनी दिला. मंगळवारी (दि.२६) सकाळी स्थानिक तिळामळ येथे जमले होते. मात्र, खनिज वाहतूक या मार्गातून सुरूच झाली नाही. तिळामळ येथे धरणे प्रदर्शनात केपेचे नगराध्यक्ष फिलू डिकॉस्ता, नगरसेवक जेम्स फर्नांडिस, प्रदीप काकोडकर, संजीत देसाई, राऊल परेरा, मेकलीन परेरा, मनोहर नाईक, सुदेश बांदेकर, रूपेश बांदेकर, दीपाली नाईक, कुडचडे पालिकेचे माजी नगरसेवक पुष्कल सावंत, अली शेख, संदीप नाईक उपस्थित होते. प्रदीप काकोडकर यांनी या वेळी बोलताना गेले दोन दिवस खनिज वाहतूक बंद असून आंदोलकांचा आवाज प्रशासनासमोर पोचला आहे असे दिसून येते. यावरून आमच्या मागण्या सरकारला मान्य आहेत, असे दिसून येते. खनिज कार्यालयातर्फे ६00 ट्रकांना वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दंडीत केले आहे जर ही गोष्ट खरी आहे तर यापूर्वी का दंडीत केले नाही. यापूर्वी खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून कायद्याचे उल्लंघन होत नव्हते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बुधवारी पुन्हा एकदा तिळामळ जंक्शनवर एकत्र येऊन रिवण चर्चला भेट देऊन चर्चचा पाठिंबा घेणार असल्याचे सांगण्यात आले. सरपंच प्रदीप देसाई यांनी आपला पूर्ण पाठिंबा आंदोलकांना असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
बगलमार्ग होईपर्यंत वाहतूक रोखणार
By admin | Published: April 27, 2016 2:00 AM