पणजी: वादळ व पावसाची आगामी सूचना देणाऱ्या हवामान खात्याच्या डॉप्लर रडारचे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचीव डॉ. ए. राजीवन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रडारच्या उद्घाटनामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टी डॉप्लर रडारच्या शृंखलांनी व्यापल्यामुळे पूर्णपणे रडारच्या टापूत आली आहे.प्रत्येक दहा मिनिटांत हवामान विषयक माहिती देणारे डॉप्लर रडारचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. ए. राजीवन यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश, हवामान खात्याच्या गोवा केंद्राचे संचालक एम. एल. साहू व इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी मुंबई, कोची आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी डॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात आली होती. मुंबई आणि कोची येथील रडारमध्ये बरेच अंतर असल्यामुळे बराचसा भाग हा रडारच्या कक्षेत येत नव्हता. आता गोव्याच्या समावेशाने पूर्ण पश्चिम किनारपट्टी डॉप्लर रडारच्या टापूत आली आहे. या रडारच्या लोकार्पणामुळे चक्रिवादळ अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींची लोकांना आगावू माहिती मिळणार आहे. २ किलोमीटर अंतरापर्यंतच्या कक्षेतील हवामानाचा वेध हे रडार घेऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.आणखी किमान दहा डॉप्लर रडारे देशात विविध ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी राजीवन यांनी दिली. वास्तविक ९ वर्षां पूर्वीच हे डॉप्लर कार्यान्वित करण्यात येणार होते. परंतु ते चिनी बनावटीचे असल्यामुळे संरक्षणमंत्रालयाने त्याला सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतला होता. संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळायला बरीच वर्षे जावी लागली. वास्तविक हे रडार यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. त्याद्वारे मिळालेली माहितीही वेबसाईटवर दिली जात होती. आता त्याची अधिकृतपणे घोषणा तेवढी झाली आहे.संपूर्ण गोवा डॉप्लरच्या कक्षेतडॉप्लरची कक्षा ही तशी ३०० किलोमीटरपासून अधिक आहे, परंतु २५०च्या त्रिज्येपर्यंतचा अंतरावरील वा-याच्या गतीचा वेध ते अचूक घेऊ शकते. तसेच १५० किलोमीटरपर्यंत त्रिज्येच्या कक्षेतील ढगांची छायाचित्रे टीपण्याची क्षमता त्यात आहे. गोव्याची लांबीच आहे अवघी ११० किमी एवढी. त्यामुळे आल्तिनो पणजी इथे कार्यान्वित केलेल्या या डॉप्लर रडारच्या केवळ ८० किलोमीटर त्रिज्येच्या कक्षेतच संपूर्ण गोवा व्यापला जात आहे. त्यामुळे गोव्यातील आभाळात कुठेही ढगांची दाटी किंवा हवेतील प्रवाहात झालेले बदल अचूकपणे या रडारला टिपता येणार आहेत.
भारताचा पश्चिम किनारा डॉप्लर रडारच्या टापूत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 9:58 PM