पणजी - रस्ते, रेल्वे, हवाई मार्गाबरोबर आता गोव्याला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आता तुम्ही समुद्रमार्गेही गोव्याला जाऊ शकता. येत्या डिसेंबरपासून गोवा-मुंबई फेरी बोट सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. गडकरींनी काल बैठक घेऊन गोव्यातील महत्वाच्या बंदरांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
सागरमाला योजनेतून एक कोटी नोक-यांची निर्मिती होईल. त्यातील 40 लाख नोक-या थेट निर्माण होतील असे गडकरींनी सांगितले. साठ-सत्तरच्या दशकात कोकण किनारपट्टीवर पणजी ते मुंबई दरम्यान फेरी बोट सेवा चालायची. प्रवासी त्यावेळी रस्ते मार्गाऐवजी जलप्रवासाला प्राधान्य द्यायचे. 1994 साली दमानिया शिपिंगने मुंबई-गोवा दरम्यान फेरी बोट सेवा चालू केली होती. या बोटींमध्ये विमानासारखी आसनव्यवस्था होती. या बोटीने त्यावेळी मुंबईहून गोव्याला जायला सात तास लागायचे.
2004 सालापासून गोवा-मुंबई समुद्र मार्गावरील जलप्रवास बंद झाला. गडकरींनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रथमच मुंबई-गोवा जलप्रवास प्रकल्पामध्ये गुंतवणूकीसाठी इच्छुक असलेले ऑपरेटर्स आणि अन्य संबंधितांबरोबर चर्चा केली. प्रकल्प वेगाने मार्गी लागावा यासाठी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेण्यात आली.