वास्को: शुक्रवारी (दि.५) संध्याकाळी ६.२० च्या सुमारास दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी येथील मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या एका मासेमारी ट्रोलरला आग लागून तो त्यात जळून खाक झाला. आगीत खाक झालेल्या त्या ट्रोलरच्या बाजूला अन्य दोन ट्रोलर उभे असून त्यांनाही याघटनेत काही प्रमाणात आगीची झळ बसलेली आहे. सुदैवाने याघटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहीती वेर्णा अग्निशामक दलाच्या अधिकाºयांकडून प्राप्त झाली.
कुठ्ठाळी जंक्शनपासून थोड्याच अंतरावरावरील मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या ट्रोलरपैंकी एकाला आग लागल्याची माहीती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळावर पोचल्यानंतर दोन ट्रोलरा मदोमद असलेल्या अन्य एका ट्रोलरला भयंकर आग लागल्याचे जवानांना दिसून येताच त्यांनी त्वरित आग विझवण्याच्या कामाला सुरवात केली. या ट्रोलरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळावर दोन अग्निशामक बंबांनी पाचारण करून पाण्याचे फव्वारे मारण्यात आले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी त्या ट्रोलरला लागलेली आग विझवण्यास दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले, मात्र तोपर्यंत सदर ट्रोलर आगीत एकंदरीत जळून पूर्ण खाक झाला. खाक झालेल्या त्या ट्रोलरच्या बाजूतील अन्य दोन ट्रोलरांना काही प्रमाणात आगीची झळ बसल्याने त्यांचीही काही प्रमाणात नुकसानी झाली आहे.
अग्निशामक दलाच्या माहीतीनुसार आगीत खाक झालेला तो मासेमारी ट्रोलर मडगाव येथील जो फर्नांनीस यांच्या मालकीचा आहे. याघटनेत त्याचा ट्रोलर जळून खाक झाल्याने त्याला सुमारे १५ लाखाची आर्थिक नुकसानी झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागण्यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. सुदैवाने घटनेवेळी या ट्रोलरवर कोणीही नसल्याने येथे होणारा पुढचा अनर्थ टळला. वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.