मड़गाव - शेळ-मेळावली येथिल प्रस्तावित आयआयटीला होणारा गांवकऱ्यांच्या विरोध प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी बेजबाबदारपणाचे वक्तव्य करुन भूमिपुत्रांचा अपमान केल्याचा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने केला आहे. मंत्री गोविंद गावडेनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. "शेळ मेळावलीतील या प्रस्तावित प्रकल्पासाठी आदिवासी लोकांची किती जमीन जात आहे हे तुम्हाला तरी माहित आहे काय असा उलट प्रश्न पत्रकारांना विचारणे आणि अजून पर्यंत आपल्या पुढे त्यांचे प्रतिनिधित्व आलेले नाही असे आदिवासी कल्याण मंत्र्यांनी म्हणणे दुर्देवी आहे असे गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.शेळ मेळावली येथील आदिवासी समाजाने या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, तसेच खुद्द आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांना जुलै २०२० मध्ये या संदर्भातील रीतसर निवेदन दिले आहे असे सांगुन गोविंद गावडे जाणिवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे कॉंग्रेसने म्हटले आहे. गोंयच्या कूळ मुंडकारांचो आवाज आणि गाकुवेध या संघटनांनी या संदर्भात आपला पाठिंबा शेळ मेळावली येथील आदिवासी समाजाला दिला आहे. या प्रकल्पासाठी आदिवासी लोकांचीही जमीन जात असल्यानेच या संघटनानी त्यांना पाठिंबा दिला आहे हे मंत्री गोविंद गावडे यांना कळत नाही का असा प्रश्न चोडणकर यांनी विचारला आहे. भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी आता लोकांच्या आवाजापुढे वाकून हा प्रकल्प शेळ मेळावली इथे नकोच असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे व भाजप सरकारला उघडे पाडले आहे. परंतु अपक्ष आमदार असलेले गोविंद गावडे आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याच समाजावर अन्याय करुन सरकारची बाजू घेत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.आपण एक जबाबदार व्यक्ती असल्याने आपण त्या विषयावर बोलू शकत नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील ते आपल्याला मान्य आहे अशी भूमिका गोविंद गावडे यांनी घेणे हे धक्कादायक असल्याचे चोडणकर म्हणाले. मंत्री गोविंद गावडे शिक्षण क्षेत्रात तज्ञ नसतील, पण आपल्या आदिवासी समाजावर अन्याय होत आहे हे उघड्या डोळ्यानी बघणे हे योग्य नाही असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
शेळ मेळावली प्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी भूमिका स्पष्ट करावी: कॉंग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 8:51 PM