लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय जनता पक्षाने लोकांना १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले असून, येत्या स्वातंत्र्यदिनी किमान एक लाख घरांवर तिरंगा फडकेल, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते अॅड. नरेंद्र सावईकर यांनी काल, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, येत्या स्वातंत्र्यदिनी एक उत्साही आणि देशभक्तिमय वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक घरावर तिरंगा फडकविला जाईल. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तिरंगा केव्हा आणि कसा लावला जावा याची माहितीही देण्यात आली आहे. राज्यातील एक लाख घरांवर तिरंगा फडकेल, असा मनोदय भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून, सर्व नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन सावईकर यांनी केले.
स्वातंत्र्यदिनी आपल्या देशातच नव्हे तर विदेशातील भारतीयही आपापल्या ठिकाणी तिरंगा फडकवून मानवंदना देतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्याबरोबर यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष सर्वानंद भगत आणि महासचिव दयानंद सोपटे उपस्थित होते.
बाईक शोभायात्रा...
स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्षाने तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यात तीन दिवस तिरंगा बाइक शोभायात्रा, १४ ऑगस्ट रोजी विभाजन स्मृतिदिन, इतर कार्यक्रमांचे आयोजनही आहे. त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाइल फोटो म्हणून तिरंगा ठेवतील, असेही त्यांनी सांगितले. ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.