- सदगुरू पाटीलपणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) विधानसभा निवडणुका पूर्ण शक्तीने व क्षमतेने लढविणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात आम्ही मुख्यमंत्रीपदासाठीचा आमचा उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी खास ‘लोकमत’ला सांगितले.किशोर हे गोवा भेटीवर आले आहेत. ‘लोकमत’चे गोवा निवासी संपादक सदगुरू पाटील यांनी किशोर यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तृणमूल काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी नुकताच प्रवेश केला. गोव्यात काँग्रेस व सत्ताधारी भाजपला अस्थिर करण्याच्या दृष्टीने तृणमूल कामाला लागला असल्याचे संकेत मिळतात. याविषयी प्रशांत किशोर यांना विचारले असता ते म्हणाले,“मोदी-अमित शहा यांच्या भाजपला पराभूत करता येते, हे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दाखवून दिले. आम्ही गोव्यात हेच दाखवून देणार आहोत. जेव्हा विरोधातील काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपला पराभूत करण्याबाबत कमी पडतो, तेव्हा लोक दुसरा पर्याय शोधतात. आम्ही मणिपूरवगैरे भागात गेलो नाही. तिथे काँग्रेस पक्ष सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढतोय. गोव्यात मात्र काँग्रेसने सर्व तलवारी म्यान केलेल्या आहेत.”
विजयबाबू दर्डांविषयी विचारपूस दरम्यान, प्रशांत किशोर यांनी लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन विजयबाबू दर्डा यांच्याविषयी मोठ्या आस्थेने विचारपूस केली. आपण दिल्लीत एकदा दर्डा यांना भेटलो होतो. आता ते कसे आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, माझा नमस्कार त्यांना कळवा, असे किशोर म्हणाले.
प्रसाद गावकर यांचा पाठिंबा गोव्यातील अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना काँग्रेसचे निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काँग्रेसमध्ये येण्याची व पुढील निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याची ऑफर दिली होती. मात्र गावकर यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली व बुधवारी त्यांनी मी पुढील निवडणूक तृणमूलतर्फे लढवीन, असे जाहीर केले. येत्या फेब्रुवारीमध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.