मडगाव: गोव्यातील मडगावात एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण करुन लुटल्याप्रकरणात येथील कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या त्रिकुटांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी अन्य एक संशयित अजूनही फरार असून, सदया पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
समीर बेपारी (२६) , कासिम कुंदगन (२३) व सादीक नालबंद (२२) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात उभे केले असता, त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्यांना कोलवाल तुरुंगात पाठवून देण्यात आले.कर्नाटक राज्यातील बेळगाव रेल्वे स्थानकावर कनिष्ठ अभियंता म्हणून काम करीत असलेले मिथुन राज के .के . (३५) हे रेल्वेच्या एका कार्यक्रमासाठी गोव्यात आले होते.
चोरटयांनी त्यांना मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावरच मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व बॅग असा साडेसहा हजारांचा ऐवज लंपास केला होता. २५ फेब्रुवारीला ही घटना घडली हाेती.भांदसंच्या ३९२ कलमाखाली कोकण रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले होते.पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी तपास करताना वरील तिघांना पकडले होते. यातील समीर बेपारी हा अट्टल चोरटा असून, एका दरोडा प्रकरणात त्याला शिक्षा होउन त्याने तुरुंगवासही भोगला होता.