लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील भाजप सरकार हे डबल नव्हे, तर ट्रिपल इंजिनचे आहे. या ट्रिपल इंजिनच्या सरकारला म्हादई वाचवण्यास पूर्णपणे अपयश आल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते डेरीक ओब्रेयान यांनी पत्रकार परिषदेत केली.
पिलार येथे टीएमसीकडून उत्तर गोव्यातील कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यानंतर ते बोलत होते. राज्यातील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांवर त्यांना अपयश आले आहे. सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
ओब्रेयान म्हणाले, की २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला विजय प्राप्त झाला नसला तरी बऱ्यापैकी मते मिळाली. २०२२ ते २०२३ या एक वर्षाच्या काळात टीएमसीने गोव्यात काम बरेच काम केले आहे. पक्ष मजबुतीवर भर देत आहोत. २०२७च्या निवडणुकीत टीएमसी सत्तेत येईल व एक चांगले प्रशासन जनतेला देईल.
म्हादई वाचवणे असो किंवा जनतेला तीन सिलिंडर मोफत देणे. सर्व गोष्टींवरच या सरकारला अपयश आले आहे. यावेळी पक्षाचे गोवा प्रभारी खासदार कीर्ती आझाद, नेते समील वळवईकर व मारीयानो रॉड्रिग्स उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"