लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: साखळी नगरपालिकेत भाजपच्या अकराही उमेदवारांनी विजय मिळवून साखळीत इतिहास रचला, याचा आपल्याला अत्यानंद होत आहे यापुढे अधिक नव्या जोमाने साखळीच्या विकासाला मोठी चालना देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
साखळीतील अकराही नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, दामू नाईक, एनआरआय आयुक्त अँड. नरेंद्र सावईकर, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लेकर, सरचिटणीस कालिदास गावस, राया पार्सेकर, संजय नाईक, राजन फाळकर तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. साखळी पालिका भाजपकडे आल्याने विकासकामे आता जलदगतीने होतील, असा दावा यावेळी करण्यात आला.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर विजय, सांघिक प्रयत्नांना यश
मुख्यमंत्री हे प्रचारासाठी कर्नाटकात होते. त्यामुळे नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांनी आज भेट दिली व त्यांचे अभिनंदन केले. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मतदार व सर्व घटकांच्या सांघिक प्रयत्नांतून हा विजय असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचतात. त्यामुळे भाजपच्या विचारधारेस जनता अनुकूल असून या विजयामुळे साखळीत अपेक्षेप्रमाणे ट्रीपल इंजिन सरकार आलेले आहे.
साखळीला आधुनिक बनवणार
साखळीला अधिक आधुनिक करण्यासाठी संघटित कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सदानंद तानावडे व पक्ष कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अभिनंदन केले. सदानंद तानावडे यांचे मार्गदर्शन व सर्वांचे सहकार्य मुख्यमंत्र्यांची वाढत चाललेली लोकप्रियता यामुळे आम्हाला मोठा विजय संपादन करणे शक्य झाल्याचे गोपाळ सुलकर, कालिदास गावस यांनी सांगितले.