पणजी : शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या खाण अवलंबित ट्रकचालकांनी पाच लाख रुपये पॅकेजच्या मागणीसाठी बुधवारी शहरात रस्त्यावर उतरत मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. चतुर्थीसाठी अडीच लाख रुपये न दिल्यास २१ दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कुटुंबीयांसह मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महामोर्चा काढला जाईल, असा इशारा शिवसेना राज्यप्रमुख अजितसिंग राणे यांनी दिला. कांपाल पाटो मैदानाहून निघालेला मोर्चा शहरात फिरून आझाद मैदानावर आला आणि तेथे जाहीर सभेत रूपांतर झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात आजच्यापेक्षा तिप्पट आंदोलक सहभागी होतील. कामगारही रस्त्यावर येतील, असा इशारा अजितसिंग राणे यांनी दिला. भरती धोरण निश्तिच करा... सार्वजनिक तसेच खासगी कंपन्यांमध्ये; इतकेच नव्हे, तर असंघटित कामगारांसाठीही सरकारने भरती धोरण निश्चित करायला हवे, अशी मागणी राणे यांनी केली. गोव्याबाहेरून उद्योग येतात आणि भूमिपुत्रांना डावलून निरक्षर परप्रांतीयांची भरती करतात. हा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. सरकारने खाणबंदीची झळ पोहोचलेल्या ट्रकमालकांना पॅकेज दिले. मात्र, ट्रकांवर काम करणाऱ्या चालकांना, क्लिनरना पैदेखील दिली नाही. (पान २ वर)
ट्रकचालक ‘रस्त्यावर’!
By admin | Published: September 10, 2015 2:01 AM