पणजी - राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मेघालयमध्ये झालेल्या बदलीवर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. सत्य व भाजप यांची सांगड होऊच शकत नाही व त्यामुळेच राज्यपालांच्या बदलीचा आदेश निघाला, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.कामत म्हणतात की, राज्यपाल मलिक हे सत्याचे पालक होते. त्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती नेमकी त्याचवेळी त्यांची बदली होणे हे दु:खदायी आहे. मलिक यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले. सामान्य माणसांचा आदर करणे, पर्यावरण व निसर्गाची राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा, असा सल्ला सरकारला नेहमी देत होते.गोमंतकीयांच्या ह्रदयात त्यांनी स्थान निर्माण केले असून गोवा त्यांना नेहमीच अभिमानाने व आदराने पाहणार आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशाने प्रत्येक गोमंतकीयाला धक्काच बसला असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांची संतप्त प्रतिक्रियाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही राज्यपालांच्या बदलीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, डिफेक्टिव्ह सावंत सरकारची आणखी एक नामुष्की टाळण्यासाठी राज्यपालांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री सावंत, प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मिळून संगनमताने ही बदली केली आहे. भाजप आणि ड्रग माफिया यांचे संबंध काँग्रेसने सोमवारी उघड केल्यानंतर ही बदली झालेली आहे.गोवा फॉरवर्डकडूनही संतापगोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही राज्यपालांच्या बदलीवर कडक प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई म्हणतात की, राज्यपाल मालिक हे गोव्यातील कोविड स्थितीवर नेहमीच सत्य बोलले. म्हादईच्या प्रश्नावर त्यांनी कडक भूमिका घेतली. सरकारची आर्थिक स्थिती बिकट असताना नवे राजभवन नको, यावर ते ठाम राहिले. मुख्यमंत्र्यांच्या असंस्कृतपणावरही बोट ठेवले. त्यामुळे त्यांची बदली होणार, हे अपेक्षित होते.दरम्यान, महाराष्ट्रात कोविड पॉझिटिव्हिटचे तसेच मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असताना व तेथील परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांवर गोव्याची अतिरिक्त जबाबदारी कशी?,असा सवालही सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.काय खटकले हे जनतेला कळायला हवे!- मगोप अध्यक्षांची प्रतिक्रियामहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही राज्यपालांच्या बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, राज्यपालांचा दृष्टीकोन गोव्याच्या हिताचा होता. सरकारने त्यांना सहकार्य करायला हवे होते. या सरकारला राज्यपालांचे काय खटकले हे जनतेला कळायला हवे. राज्यपाल गोव्याच्या जनतेचा विश्वास संपादन करून होते. सर्वांना ते सहकार्य करीत होते तसेच म्हणणे नम्रपणे ऐकून घेत होते. पाणी कुठे मूरते हे जनतेला जनतेला कळायला हवे.भाजपला 'रात्रीचा खेळ चाले'करणारे हवेत : शिवसेनेची टीकाशिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनीही राज्यपालांच्या बदलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कामत म्हणतात की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चांगल्या माणसांची ॲलर्जी आहे. मलिक यांनी राज्यपालपदावर लागलेला रबर स्टॅम्पचा कलंक पुसून टाकला होता, पण भाजपला 'रात्रीचा खेळ चाले' करणाऱ्यांची जास्त गरज आहे.
"सत्य अणि भाजप यांची सांगड होऊच शकत नाही," राज्यपालांच्या बदलीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 9:52 PM