पणजी : गोव्यातील भाजपमध्ये निर्माण झालेला प्रचंड कलह हा जाहीरपणे लोकांसमोर आलेला असल्याने आता भाजपचे संघटन मंत्री विजय पुराणिक व इतरांनी मिळून हा कलह मिटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुका व दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका या पाश्र्वभूमीवर पक्षात एवढा कलह असू नये, असे पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना वाटते. पक्षाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यात जाहीरपणे झालेले आरोप-प्रत्यारोप ही गोष्ट भाजपच्या गाभा समितीलाही चिंताजनक वाटत आहे.
पूर्वी पक्षात कोणताही कलह निर्माण झाला व जाहीरपणे टीका होऊ लागली की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पुढाकार घेऊन कलहावर पांघरूण घालत असत. जाहीरपणे तरी वाद नको असे ते नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगत असत आणि त्यांची सूचना ऐकली जायची. आता मुख्यमंत्री गंभीर आजारामुळे कुणालाच काही सूचना करण्याच्या स्थितीत नाहीत. मुख्यमंत्री पर्रीकर हे त्यांच्या निवासस्थानीच असून त्यांच्याशी कुणाचा संवाद होत नाही. अशावेळी माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे आक्रमक बनले आहेत. त्यांनी जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांच्यावर हल्ला चढवला. तेंडुलकर हे अकार्यक्षम असून त्यांनी पद त्याग करावा, अशी मागणी पार्सेकर यांनी केली.
पार्सेकर हे गोवा भाजपचे संस्थापक सदस्य आहेत. माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनीही काँग्रेसमधील आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याच्या कृतीबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. गोवा भाजपपचे 2012 सालापर्यंत मार्गदर्शक राहिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीही भाजपमधील सध्याच्या स्थितीवर जोरदार टीका चालवली आहे. भाजपचे काँग्रेसीकरण झालेले असून यापुढे विधानसभेचे पाच मतदारसंघ देखील जिंकणे भाजपला शक्य होणार नाही, असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
गोवा, महाराष्ट्र व गुजरातसाठी भाजपचे संघटनमंत्री म्हणून काम पाहणारे पुराणिक हे सध्या गोव्यात आहेत. त्यांच्या उपस्थितीत पणजी व मडगावमध्ये भाजपच्या दोन बैठका झाल्या. अंतर्गत वाद चव्हाटय़ावर न आणता पक्ष संघटना मजबूत करा व येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करा असा सल्ला पुराणिक यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्याना दिला असल्याची माहिती मिळते.