लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात आज मोठ्या उत्साहात तुळशी विवाहसोहळा घरोघरी साजरा केला जाणार आहे. यासाठी लोकांनी आपली तुळशी वृंदावनांची रंगरंगोटी केली आहे. राज्यात बऱ्याच जणांच्या घरी ब्राह्मणांच्या हस्ते तुळशीची पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न लावले जाते. त्यानंतर सुवासिनी जोडवी पेटवून तुळशीची ओवाळणी करतात. काही ठिकाणी लोक स्वतःच लग्न लावत असतात.
साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
आज तुळशीविवाह असल्याने काल गुरुवारी राज्यभरातील बाजारपेठांमध्ये तुळशीविवाहासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. पणजी मार्केटमध्ये तुळशीविवाहसाठी लागणारे साहित्य ऊस, चिंचेची फांदी, आवळ्याची फांदी, दिंड्याचे झाड, ताडमाड व आंब्याच्या टाळ विक्रीस आले होते. एकत्र केलेले हे साहित्य १५० ते २०० रुपये दराने विकले जात होते. बहुतांश ऊस हे परराज्यातून गोव्यात विक्रीस आणले. ठिकठिकाणी रस्त्यावर ते विकले जात आहे.
तुळशीवृदांवने सजविली
दसरा, दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर तुळशीविवाह उत्सव लगबग सुरू होते. दिवाळीच्या बाराव्यादिवशी साजरी केली जाते. दिवाळीसाठी घरासमोर लावलेले आकाशदीप, विजेची रोषणाई, दररोज सायंकाळी, रात्री पणत्यांची केली जाणारी आरास ही तुळशीच्या लग्नापर्यंत चालू ठेवलेली असते. तुळशी विवाहाला लागणारी दिंड्याची काठी, ऊस, चिंच, आवळे, याच्याबरोबर पोहे चुरमुरे, लाह्या, जोडवी, तुळशीच्या लग्नाचे साहित्य उपलब्ध खरेदी केली जात आहे. पूर्वी लोक चिरमुरे, लाह्या वाटायचे आता लाडू मिठाई वाटत आहे. पण, आता काही लोक बदलत्या काळानुसार आइस्क्रीम वाटत आहेत.
डिचोलीतही तयारी
डिचोली तालुक्यात शहर, तसेच ग्रामीण भागात वर्ष पद्धतीप्रमाणे यंदाही तुळशीविवाह सण उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त घरोघरी तुलसी विवाहाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यानिमित्त घरोघरी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पणत्या प्रज्वलित करून परिसर सजविण्यात येत आहे. साखळी शहरात यंदाही तुळशी वृंदावन आकर्षक सजविण्यात आले आहे. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. डिचोली तालुक्यात बाजार भरले आहेत. ग्रामीण भागात मातीच्या तुलसी असतात. विवाह धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. तुळशीमध्ये ऊस, चिंच, आवळा, ताडमाड, फुले, आंब्याची पाने वापरून आजही पारंपरिक पद्धतीने सजावट केलेली पाहायला मिळत आहे. पोहे, चिरमुरे, गूळ वापरून प्रसाद बनविला जातो. तो मुलांना वाटण्यात येतो.