निवृत्ती शिरोडकर ,पेडणे : कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन सुजाता सातार्डेकर (२५) या युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर फैजर फ्रान्सिस मास्करेन्हास (२२) हा युवक गंभीरित्या जखमी झाला. सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, सुजाता सातार्डेकर ही ((एमएच ०७ एटी ११५०) या दुचाकीवरून मोपा विमानतळावरुन कामावरून घरी परतत होती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात सुजाता हिच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या फायजर याच्या दुचाकीला (जीए ११ २१२८) धडक दिली. त्यात सुजाता जागीच ठार झाली.तर गंभीर जखमी फैजर मास्करेन्हास हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताचा पंचनामा मोपा पोलिसांनी केला. सुजाता ही मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला होती. सकाळी कामावरून घरी परतताना कासारवर्णे येथे हा अपघात झाला.
अपघातांची मालिकाच : दरम्यान, पेडणे तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असून अनेकांचे बळी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नसल्यामुळे किंवा अती वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात घडतात. काल राष्ट्रीय महामार्ग ६६ धारगळ-सुकेकुळ येथे सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) येथील संजय सुरेश दळवी यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला २४ तासही उलटले नसताना कासारवर्णेतील या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील सुजाता हिचा बळी गेला आहे.