मडगाव: गोव्यातील मडगाव येथील उपनगरातील आल्त येथे एका फ्लॅटमध्ये दोन सख्ये भाऊ मृतावस्थेत सापडले तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत झोपलेली आढळून आली. आज बुधवारी ही दुदैवी घटना उघडकीस आल्यानंतर या भागात एकच खळबळ माजून सारा परिसर हादरुन गेला. महम्मद झुबेर खान (२९) व अफान खान (२७) अशी मयतांची नावे आहेत. तर त्यांच्या आईचे नाव रुक्साना खान (५४) असे आहे अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांअगोदर तरी झाला असावा असा कयास आहे. या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.नेमके कुठले कारणीभूत या मृत्यूस कारणीभूत आहे याचा सदया पोलिस शोध घेत आहेत.
पॅराडाईस इमारतीत वरील दुदैवी घटना घडली.मयतांच्या कुटुंबियात घरगुती कारणांमुळे वादविवाद होता. रुक्सानाचे पती त्यांच्याबरोबर रहात नव्हते. हे कुटुंबिय इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांच्याही संपर्कात रहात नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी इमारतीतील रहिवाशांनाही अधिक माहिती नाही. अनेकवेळा या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज ऐकू येत होता असे येथील स्थानिकांनी सांगितले.
रुक्साना यांचे दोन्हीही मुले चांगले शिक्षित होते. कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातूनच ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी मात्र यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. आम्ही सर्व दुष्टीकोनातून तपास करीत असल्याचे संबधितांनी सांगितले. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.
मयताचे वडील गेले दोन दिवस या फ्लॅटाकडे येत होते. मात्र आतून कुणीच प्रतिसाद देत नव्हता. आज बुधवारी सांयकाळी ते फ्लॅटवर आले होते. त्यांनी दरवाजा ठोठावूनही बघितला . मात्र कुणीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी मडगाव पोलिस ठाण्याला याबाबत कळविले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मडगाव अग्नीशामक दलाच्या कार्यालयालाही बोलावून घेण्यात आले. दलाच्या जवानांनी दरवाजा उघडल्यानंतर आतील परिस्थिती उघड झाली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये अन्नपाणीचा एक कणही नव्हता.मडगाव पोलिस विभागाचे पोलिस उपअधिक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. दोन्ही मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवले आहेत. तर तीच्या आईला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.