पणजी - गोव्यात पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सींना डिजीटल मीटर्स लावण्यासाठी वाहतूक खात्याने निविदा जारी केल्यानंतर आता दोन कंपन्यांना या कामासाठी निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी गुरुवारी लोकमतला दिलेल्या मुलाखती दरम्यान दिली.
संचालक देसाई म्हणाले, की तांत्रिक व आर्थिक निविदा उघडण्यात आल्या. दोन कंपन्यांनी डिजीटल मीटरचे काम मिळावे म्हणून निविदा भरल्या होत्या. दोन्ही कंपन्या पात्र ठरतात. दोन्ही कंपन्यांना काम दिले जाईल. आम्ही मंजुरीसाठी फाईल सरकारला पाठवली आहे. सरकारची मंजुरी मिळताच आर्थिक मंजुरी मिळविली जाईल व मग कामाचा आदेश दिला जाईल. पुढील महिन्याभरात टॅक्सींना डिजीटल मीटर लावण्याचे काम सुरू होईल.
देसाई म्हणाले, की टॅक्सींना डिजीटल मीटर लावल्यानंतर ग्राहकांच्या अनेक तक्रारी जवळजवळ संपुष्टात येतील. मीटरसोबत प्रिंटर व धोक्याचे बटणही असेल. टॅक्सीच्या वरील भाग बाहेरून पाहिल्यानंतरच टॅक्सीला पॅनिक बटन आहे की नाही ते ग्राहकाला कळेल. टॅक्सींकडून ज्यादा भाडे आकारले जाते किंवा अन्य तक्रारी पर्यटक करू शकणार नाहीत. गोव्यात रोज काही हजार टॅक्सींकडून देश- विदेशी पर्यटकांची वाहतूक केली जाते.
देसाई म्हणाले, की दहा इंटरसेप्टर्स व अल्कोमीटर खरेदी करण्यासाठीही निविदा जारी करण्यात आली आहे. येत्या 18 रोजी तांत्रिक निविदा उघडली जाईल. मद्यपी चालकांना जरब बसावी म्हणून इंटरसेप्टर व अल्कोमीटर घेतले जात आहेत. गोव्यातील पुल, अपघातप्रवण क्षेत्रे व अन्य काही ठिकाणी कॅमेरे लावण्याचाही खात्याचा विचार आहे. त्यासाठी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला खात्याने प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.