गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:30 AM2018-10-16T06:30:55+5:302018-10-16T06:31:15+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही सोमवारी पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. या पार्श्वभुमीवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार आज पहाटे भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांनाही आली आहे. सरकारमधील तीन मंत्री १७ किंवा १८ रोजी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवतील. पर्रीकर दोनापावल येथील निवासस्थानी आहेत. ते २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सत्तेतील घटक पक्ष पर्यायी मुख्यमंत्री कोण असेल, याची चर्चा करीत आहेत. शर्यतीत आरोग्यमंत्री विश्वजित राणे पुढे आहेत. मात्र, मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना मंजुरी नाही. गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांचा राणे यांना पाठिंबा आहे. राणे हे काँग्रेसमधून आलेले असल्याने त्यांचे समर्थक आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे काँग्रेसचे दोन आमदार आज दिल्लीमध्ये भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे.
#Visuals from Goa airport: Two Congress MLAs Subhash Shirodkar and Dayanand Sopte leave for Delhi with AYUSH Minister Shripad Naik. pic.twitter.com/7gYc9HHvqo
— ANI (@ANI) October 15, 2018
काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत, असा प्रयत्न भाजपा करीत आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना भाजपाने गळ टाकलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा करू नये, अशी मागणी केली आहे.