लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कृषी खात्यातर्फे नारळ उत्पादनावर देण्यात येणारी आधारभूत किमत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४८९ शेतकऱ्यांना एकूण १ कोटी ७२ लाख ४८ हजार ८६१ रुपये अनुदानीत रुपात देण्यात आले. तसेच ४९० शेतकऱ्यांचा एकूण २ कोटी ५३ लाख १८ हजार ८९९ एवढा निधी देणे बाकी आहे, अशी माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
कृषी खात्याने गेल्या आर्थिक वर्षात अनुदानीत योजनेसाठी एकूण ९७९ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. कृषी खात्याकडून नारळ उत्पादनावर आधारभूत किंमत म्हणून निधी दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना हा निधी दिला जातो. जास्तीत जास्त लोक शेतीकडे वळावेत, हा या मागचा हेतू आहे. पण, गेल्या वर्षीचा निधी अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खात्याकडून सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिवेशनात कृषी मंत्री रवी नाईक यांनी लेखी स्वरुपात दिली आहे.
सासष्टीतील १७४ शेतकऱ्यांना लाभ
२०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४८९ शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देण्यात आली आहे. एकूण १ कोटी ७२ लाख ४८ हजार ८६२ एवढा निधी देण्यात आला आहे. यात सार्वाधिक जास्त सासष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सासष्टीत एकूण १७४ शेतकन्यांना या निधीचा लाभ मिळला आहे तर केपे तालुक्यातील १०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
सत्तरीतील शेतकऱ्यांना अनुदान प्रलंबित
कृषी खात्याकडून अजूनही ४९० शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे. सत्तरी तालुक्यातील अद्याप एकाही शेतकऱ्याला अनुदान मिळालेले नाही. सासष्टी तालुक्यात एकूण २९८ जणांनी अर्ज केले होते. यातील १७४ जणांना लाभ मिळाला आहे. तर सांगे तालुक्यातील २२९ शेतकऱ्यांनी अर्ज केले यातील ८१ जणांना अनुदान मिळाले आहे. तर केपे तालुक्यातील १७२ शेतकऱ्यांपैकी फक्त १०९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.