लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : कुंडई येथे मंगेशीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उतरणीवर दुचाकी घसरून पडल्याने दुर्गाभाट येथी तरुणाचा मृत्यू झाला. शौनक शौनक नाईक दिलीप नाईक (वय २४) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी अपघाताची घटना घडली. मात्र, या घटेनच्या दोन दिवस आधीच त्याने नोकरीच्या पहिल्या पगारातून कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रांना पेढे वाटले होते.
सविस्तर वृत्तानुसार, शौनक नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी कामावरून आपल्या दुचाकी (जीए ०५ क्यू ४५९०) वरून फोंड्याच्या दिशेने येत होता. उतरणीवर अचानक त्याची दुचाकी घसरली व तो रस्त्यावर आदळला गेला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिकांच्या मदतीने त्याला बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथे शुक्रवारी रात्रीपासून त्याच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असताना शनिवारी सकाळी पावणेसात वाजता त्याची प्राणज्योत मालवली. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शौनकचे वडील दिलीप नाईक हे गोमंतक भंडारी समाजाचे केंद्रीय समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या पुत्राच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच विविध क्षेत्रातील लोकांनी नाईक कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री रवी नाईक, भंडारी केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक, भंडारी अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक हे अंत्यसंस्कारवेळी उपस्थित होते.
पहिला पगार मिळाला
शौनक एकुलता एक होता. अभियंता शाखेची पदवी घेतल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच तो कुंडई येथील एका कंपनीत कामाला लागला होता. अपघाताच्या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच त्याचा पहिला पगार झाला होता. आपल्या पहिल्या पगाराला त्याने नातेवाइकांना व मित्रमंडळींना पेढे वाटून आनंद साजरा केला होता. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वाटलेल्या पेढ्याचा गोडवा कमी व्हायच्या अगोदरच काळाने त्याच्यावर झडप घातली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"