वास्को : वाडे, दाबोळी येथे साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याप्रकरणी वास्को पोलीसांनी २४ तासात छडा लावून दोघा मजुरांना अटक केली आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात पोलीसांनी २२ वर्षीय उपनेश कुमार (मूळ: बिहार) आणि २४ वर्षीय मुरारी कुमार (मूळ: बिहार) यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
वाडे तालावाच्या जवळील बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात संशयास्पद मरण पावलेल्या साडेपाच वर्षीय मुलीवर शुक्रवारी (दि.१२) मडगाव जिल्हा इस्पितळात शवचिकीत्सा केली असता तिचा बलात्कार करून नंतर गळा आवळून खून केल्याचे शवचिकीत्सक अहवालातून उघड झाले होते. त्या साडेपाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी त्या आरोपींना गजाआड करण्यासाठी सर्व मार्गाने चौकशीला सुरवात केली होती. पोलीसांनी चौकशीला सुरवात करून २४ तासात त्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना गजाआड केले. पोलीसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे उपनेश कुमार आणि मुरारी कुमार अशी असल्याची माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे ते आरोपी वाडे येथील बांधकाम चालू असलेल्या इमारतीत मजुर म्हणून कामाला असून एकटा पेंटर तर दुसरा गवंडी काम करायचा अशी माहीती प्राप्त झाली. अटक केलेले दोन्ही आरोपी बिहार येथील असून एका वर्षापासून ते वाडे येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करायचे.दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता वास्को पोलीसांनी ह्या प्रकरणात त्वरित कारवाई करून २४ तासात मुलीचा बलात्कार आणि तिची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना गजाआड करून अटक केल्याचे सांगितले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी त्यांचा गुन्हा पोलीसांसमोर स्वीकारल्याची माहीती सावंत यांनी दिली. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे शवचिकीत्सक अहवालातून निश्पन्न झाल्यानंतर वास्को पोलीसांनी बांधकाम चालू असलेल्या इमारतीत काम करणाऱ्या २० कामगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी कसून चौकशीला सुरवात केली. चौकशीवेळी उपनेश आणि मुरारी यांनीच मुलीवर बलात्कार आणि नंतर तिचा गळा आवळून खून केल्याची माहीती आणि विविध पुरावे हाती लागले अशी माहीती पोलीस अधीक्षक सावंत यांनी दिली. उपनेश आणि मुरारी ह्या मजूरांनी साडेपाच वर्षीय मुलीचा बलात्कार आणि खून केल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर त्यांच्याशी कसून चौकशीला सुरवात केली असता त्यांनी तो घृणास्पद अपराध केल्याची कबूली दिल्याची माहीती सावंत यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींच्या काही वैद्यकीय तपासणी केल्या जाणार असल्याची माहीती पोलीस अधीक्षक सावंत यांनी दिली. साडेपाच वर्षीय मुलीचा बलात्कार आणि खून प्रकरणाचा छडा लावून आरोपींना गजाआड करण्यासाठी मुरगाव पोलीस उपअधीक्षक संतोश देसाई, वास्को पोलीस निरीक्षक कपील नायक आणि इतर पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांनी खरोखरच उत्तम कार्य केल्याचे पोलीस अधीक्षक सुनिता सावंत म्हणाल्या. वास्को पोलीस साडेपाच वर्षीय मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
अटक केलेल्या दोन मजुरांपैकी एकटा मुलीचा बलात्कार आणि खून झालेल्या घटनेच्या एका दिवसापूर्वी तिच्या खोलीत जबरदस्तीने घुसून त्यांने तिच्या आईला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहीती तपासणीत उघड झाल्याचे पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी सांगितले. एक अज्ञात व्यक्ती घरात घुसून आपल्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुलीच्या आईला समजताच तिने आरडा ओरडा मारल्या असता तिचा पती तेथे आला. ते पाहून त्या मजुराने तेथून पळ काढली. जबरदस्तीने तो मजूर खोलीत घुसला त्यावेळी तो दारूच्या नशेत होता अशी माहीती त्या महिलेच्या पतीकडून मिळाली. मुलीचा वडील सुरक्षा रक्षक म्हणून बांधकाम चालू असलेल्या इमारतीत कामला असून तो कामगार खोलीत घुसल्याची तक्रार त्याने नंतर इमारत बांधकामाचे काम पाहणाऱ्या पर्यवेक्षकाला दिली होती. पर्यवेक्षकाने त्या प्रकरणात दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते अशी माहीती चौकशीत उघड झाल्याचे पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. त्या घटनेची वास्को पोलीस स्थानकात तक्रार झाली नव्हती. बलात्कार आणि खून प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही आरोपींची त्यांच्या गावात अथवा अन्य कुठे गुन्हेगारीत समावेश आहे का त्याबाबतही चौकशी करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.