लोकमत न्यूज नेटवर्कवास्को : शुक्रवारी पहाटे मुरगाव बंदरातील जिंदाल साउथ व्हेस्ट पोर्ट कंपनीच्या कोळसा हाताळणी जागेत काम करताना दोन मजूर कोळशाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले़ त्यांना ढिगाऱ्याखालून काढले असता एकजण बचावला तर दुसऱ्याचा ढिगाऱ्याखाली गुदमरून मृत्यू झाला़ ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली़ त्या वेळी मुरगाव बंदरात साठवून ठेवलेल्या कोळसा ढिगाऱ्यावर ताडपत्री घालण्याचे काम दिलीप दास आणि शाहना आली हे मजूर करत होते़ त्या वेळी अचानक सोसाट्याचा वारा आणि सोबत पाऊसही आला़ अचानक आलेल्या या तुफानामुळे त्यांचा ताडपत्रीवरील ताबा सुटला आणि कोळसा ढिगाऱ्याचा काही भाग कोसळला़ या कोळसा कोसळलेल्या भागात हे दोन्ही मजूर गाडले गेले़ जवळच काम करीत असलेल्या अन्य मजुरांनी ही दुर्घटना पाहिल्यावर आरडाओरड करून इतरांना या दुर्घटनेची माहिती दिली़ त्याचबरोबर त्यांनी तेथे असलेल्या जेसीबीच्या साहाय्याने कोळसा उसपण्याचे काम केले़ या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या कामगारांना बाहेर काढले असता शाहना अली हा मजूर जखमी झाला होता़ त्याला उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचे समजते़ तर दुसरा मजुर दिलीप दास याचा ढिगाऱ्याखाली गुदमरून जागीच मृत्यू झाल्याचे कळते़ त्याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे़ मुरगाव पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मेलितो फ र्नांडिस हे निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी करत आहेत.
कोळशाच्या ढिगाऱ्यात दोन मजूर गाडले
By admin | Published: July 15, 2017 2:05 AM