लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बड्या तारांकित हॉटेल्ससह इतर ठिकाणी आदरातिथ्यासाठी सेवा क्षेत्रात पुढील पाच वर्षांत गोव्यात दोन लाख नोकऱ्या निर्माण होतील. त्यामुळे सरकारने आयटीआय केंद्रांमध्ये सुरू केलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन हा रोजगार गोमंतकीय तरुणांनी मिळवावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कला अकादमी संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह टाटा, जग्वार, ताज हॉटेल, पुत्झमायझर व इतर कंपन्यांचे प्रतिनिधी, आयटीआय केंद्रांमधील विद्यार्थी, शिक्षकही उपस्थित होते. राज्यभरातील आठवी, नववीच्या हजारो विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम लाइव्ह पाहिला. यावेळी ताज हॉटेल्सशी सरकारने सामंजस्य करार केला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आयटीआयमध्ये सहा महिने थेअरी व ताज हॉटेलमध्ये सहा महिने प्रॅक्टिकल करावे लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या ताज हॉटेल किंवा इतर बड्या हॉटेलांमध्ये शंभर टक्के नोकरी मिळू शकते युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आयटीआयमध्ये विविध अभ्यासक्रम आहेत, ते करावेत. सरकारने सर्व अकराही आयटीआय केंद्रांचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २२० कोटी रुपये खर्च केले जातील. टाटा समूहाकडून १७० कोटी रुपये मिळतील. ताज ग्रुपसारखे इतरांनी यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयातर्फे कला अकादमी संकुलात आयोजित जागतिक युवा कौशल्य दिनाच्या या कार्यक्रमास शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर, कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालयाचे संचालक एस. एस. गावकर, ग्रामीण विकास संस्थेचे संचालक गोपाळ पार्सेकर, नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, गौरीश धोंड, टाटा टेक्नॉलॉजीजचे दक्षिण विभागप्रमुख प्रशांत हंडीगुंडर व 'ताज'चे वरिष्ठ उपाध्यक्ष, रणजित फिलिपोस आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्व आयटीआय तसेच कौशल्य विकास खात्याला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. डिचोली, काकोडा, फार्मागुढी, म्हापसा व वास्को या पाच केंद्रांवर उत्कृष्टतेच्या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले तसेच कुशल कारागीर, विविध कौशल्य स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
पाच टक्केच युवक सेवा क्षेत्रात
मुख्यमंत्री म्हणाले की, बड्या हॉटेलांना लागणारे मनुष्यबळ गोव्यात मिळत नाही. त्यामुळे परप्रांतीय नोकऱ्या बळकावतात. तसे करू देऊ नका, गोव्याचे ५ टक्केच युवक सेवा क्षेत्रात येतात. पांढरपेशी नोकरी असूनही याकडे दुर्लक्ष केले जाते व सरकारी नोकरीचा आग्रह धरला जातो. तसे करू नये. प्रत्येक हाताला कौशल्य देणे महत्त्वाचे. त्यासाठी मोदींनी कौशल्य मंत्रालय सुरू केले. प्रधानमंत्री कौशल्य योजना आणली. पूर्वी स्थिती वेगळी होती. कुठेच प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थी आयटीआयकडे येत असत. आता परिस्थिती बदलली आहे.
आता विदेशी भाषांमधून टुरिस्ट अॅम्बेसिडर कोर्स
आयटीआयमध्ये लवकरच टुरिस्ट अॅम्बेसिडर हा कोर्सही सुरू केला जाणार असून फ्रेंच, जर्मन व रशियन या विदेशी भाषांमधून परदेशी पर्यटकांची कसा संवाद साधावा, हे शिकवले जाईल. हा अभ्यासक्रम केल्यानंतर पर्यटकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधता येईल आणि या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.