लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्य निवडणूक आयोगाने साखळी पालिकेतील १२ प्रभागांसाठी आणि फोंडा पालिकेच्या १५ प्रभागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक आज, शनिवारी जाहीर केले आहे. निवडणुका ५ मे रोजी होणार असून ७ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही पालिका क्षेत्रांत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही. रमणमूर्ती यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
राज्यांत ज्या पक्षाचे सरकार असते त्याच पक्षाचे पॅनेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहसा जिंकत असते. परंतु या निकषाला अपवाद राहिलेली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील साखळी पालिका यावेळी सर करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर असून त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. त्याचप्रमाणे फोंड्यात कृषिमंत्री रवी नाईक यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.
दरम्यान, दोन्ही पालिकांसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी यापूर्वीच सुरू झाली होती. अनेक उमेदवार बाशिंग बांधून तयारीही आहेत. उमेदवार म्हणून पक्षाने आपल्या नावावर शिक्कामोर्तब करावे यासाठी वशिलेबाजी सुरू आहे. आता निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे या कारवाया वेग धरणार आहेत. प्रचार कामालाही गती येणार आहे.
दोन्ही पालिकांच्या निवडणुका या सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण, साखळी पालिका ही नेहमीच विरोधकांनी जिंकून मुख्यमंत्र्यांवर घरच्या मैदानात मात केली आहे. यामुळेच यावेळी ही निकालाची परंपरा खंडित करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.
फोंडा पालिकेतही आतापर्यंत निर्विवादपणे सत्ता मिळविणे शक्य झाले नाही. काँग्रेस, मगो व इतर पक्षांना मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन करावी लागली होती. आता रवी नाईक भाजपचे आहेत. त्यामुळे या पालिकेवर निर्विवाद विजय मिळविणे हा त्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.
वेळापत्रक
- अर्ज दाखले करणे : १० ते १८ एप्रिल- अर्ज छाननी १९ एप्रिल - अर्ज मागे घेण्याची तारीख : २० एप्रिल- उमेदवारांची अंतिम यादी : २० एप्रिल- मतदान: ५ मे - मतमोजणी : ७ मे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"