वास्को : धुळवडीच्या दिवशी दुपारी दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. धुळवडीचा आनंद लुटल्यानंतर सडा येथे राहणारा १८ वर्षीय सुश्रुत सातार्डेकर नामक युवक सडा, जपानीज गार्डनखाली असलेल्या समुद्रात ४ मित्रासहीत आंघोळीसाठी गेला असता तेथे त्याचा बुडून मृत्यू झाला.
दुसरी घटना बायणा समुद्रात घडली असून दुपारी रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा तेथे बुडून मृत्यू झाला असून मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत त्याची ओळख पटलेली नसल्याची माहिती मुरगाव पोलिसांनी दिली. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन्ही घटना मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडल्या.
सडा येथे राहणारा सुश्रुत सातार्डेकर नामक युवक धुळवडीनंतर तो त्याच्या ४ मित्रासहीत जपानीज गार्डनखाली असलेल्या समुद्रात आंघोळीसाठी गेला. तो आणि त्याच्या मित्रांनी समुद्रात आंघोळ केल्यानंतर ते बाहेर आले, मात्र पुन्हा सुश्रुत समुद्रात उतरला अशी माहिती पोलीसांना चौकशीत प्राप्त झाली आहे. त्यानंतर आंघोळ करत असताना सुश्रुत अचानाक बुडायला लागला अन् नंतर तो समुद्रात दिसेना झाला. त्याच्या मित्रांनी आणि तेथे असलेल्या लोकांनी त्वरित त्याबाबत माहिती दिल्यानंतर जीवरक्षकांनी (लाईफ गार्ड) तेथे धाव घेऊन सुश्रुत चा शोध घेण्यास सुरवात केली.
काहीवेळानंतर सुश्रुत त्यांना समुद्रात आढळल्यानंतर त्याला बाहेर काढून चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहीती पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली. मुरगाव पोलीसांनी बुडून मृत्यू झालेल्या सुश्रुतच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर त्याचा मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. सुश्रुत यांनी बारावीपर्यंत शिक्षण केले असून तो ‘केटरींग’ च्या कामासाठी जायचा अशी माहीती पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत धुळवडीनंतर एक सुमारे ४० वर्षीय अज्ञात व्यक्ती बायणा समुद्रात आंघोळीसाठी गेला होता. तो आंघोळ करताना अचानक बुडायला लागला. त्याला जीवरक्षकांनी (लाईफ गार्ड) बाहेर काढून चिखली उपजिल्हा इस्पितळत उपचारासाठी नेला. मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहीती पोलीसांनी दिली. बायणा समुद्रात बुडाल्याने मरण पोचलेल्या त्या व्यक्तीची मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिली. बुडून मृत्यू झालेला व्यक्तीची चौकशी पोलीस करत आहेत. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मडगाव जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास चालू आहे.