म्हापसा : पाळीव कुत्रा पकडून नंतर त्याला मारुन त्याचं मांस खाणाऱ्या मिझोरामातील दोघांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. मिझोराम येथील मुळ रहिवासी असलेले हे संशयित सध्या कांदोळी भागात वास्तव करुन होते. त्यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२९ व प्राण्याची अमानुषपणे हत्या करण्याच्या कायदा कलम ११ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी जेरी लाल्तलांझुवा व लालनीनीया पाझवान या संशयितांना अटक करण्यात आली.
साळगाव येथे दोघा युवकांना कुत्र्याचे मांस नेताना काही लोकांनी पकडले. नंतर त्यांना कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कळंगुट परिसरातील काही हॉटेलमध्ये कुत्र्याचे मांस शिजवून त्याची विक्री केली जात असल्याचा व्हिडीयो फेसबूक तसेच वॉट्सअॅप या सोशल मीडियावर काही दिवसापासून वायरल झालेला. मात्र पकडण्यात आलेल्या दोघांनी कुत्र्याला स्वत: खाण्यासाठी मारल्याची कबुली पोलिसांना दिली. कुत्र्यांना मारुन ते त्यांचे मांस हॉटेलात विकत नसल्याचेही पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ सप्टेंबर रोजी मान्युयल परेरा (फिर्यादी) यांचा पाळीव कुत्रा गायब झाला होता. परेरा यांनी कुत्र्याची शोधाशोध सुरु केली. चौकशी दरम्यान एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने ईशान्येकडील दोघांनी कुत्रा पळविल्याची माहिती फिर्यादिला दिली. दरम्यान परेराच्या मुलींनी वायरल झालेला व्हिडीयो त्यांना दाखवला. सदर व्हिडीओतील कुत्र्याला मारणारे व्यक्ती व सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीत साधर्म्य असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्या आधारे परेरा यांनी ३ ऑक्टोबर रोजी कळंगुट पोलीस स्थानकात आपला कुत्रा पळवून नेल्याची तक्रार नोंद केली.
केलेल्या तक्रारीच्या आधारे तसेच वायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी कुत्रा चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली मात्र कुत्र्याच्या मांसाची विक्री केली नसल्याचे पोलिसांना स्पष्ट केले. तपासा अंती दोघांनी कुत्र्याला खाण्यासाठीच मारल्याचे आढळून आल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.