म्हापसा : उत्तर गोव्यात कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी कर्मचा-यांनी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केल्याची घटना मंगळवारी (13 फेब्रुवारी) मध्यरात्री घडली आहे. अती प्रमाणात भांग प्राशन केल्यानंतर उलट्या सुरू झाल्याने एक जेलगार्ड तसेच दोन कैद्यांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्याची पाळी कारागृहाच्या प्रशासनावर आली. उत्तर गोव्यात कोलवाळ येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग 17 वर असलेल्या केंद्रीय कारागृहात मंगळवारी रात्री कर्मचारी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती केली. मंगळवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. अती प्रमाणावर भांग प्राशन केल्याने जेलगार्ड व कैद्यांना नंतर उलट्या सुरु झाल्या. लागलीच त्यांना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे जेलगार्डला दाखल करुन घेण्यात आले तर इतर दोन कैद्याना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
सदर प्रकारानंतर तुरुंग अधीक्षकांनी एक बाटली जप्त केली असून त्यात भांग असल्याचे आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे; पण उपलब्ध झालेल्या माहितीनुसार अधीक्षकांनी आपल्या अहवालात सापडलेल्या बाटलीत गोळ्या मिसळून त्यांना प्यायला दिल्याचे म्हटले आहे; पण त्या संदर्भात मात्र वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. उपचारासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार सुर्वेश उर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. म्हापसा पोलीस स्थानक परिसरातील या नामवंत गुंडाना गेल्याच महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आलेली. सुमारे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या कारागृहाच्या उद्घाटनानंतर अनेक घटना घडल्या आहे. अश्फाक बेंग्रे सारख्या नामवंत गुडांचा याच कारागृहात खून करण्यात आलेला. तसेच कैद्यांनी कारागृहात हैदास घालण्याचे अनेक प्रकारही इथे घडले आहेत. घडलेल्या प्रकाराची तपासणी सुरु करण्यात आली असून इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची जबानी नोंद करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.