म्हापसा - येथील एका सराफा दुकानावर दरोडा टाकल्याच्या आरोपाखालील दोन जणांची जलदगती न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. तब्बल १६ वर्षे या खटल्यावर सुनावणी घेण्यात आली. १९ वर्षा पूर्वी १५ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष योग्य पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्याने पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली.
या प्रकरणात ज्येवलर्स दुकानाचे मालक संदीप लोटलीकर यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर संशयित आरोपी संतोष गणाजी खंडागळे ( चिंचवड - पुणे) तसेच रमेश देसाई ( पुणे) या दोघांना अटक करण्यात आलेली. नंतर त्यांना जामीनावर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान रमेश देसाई याचा मृत्यू झाला होता.
घटनेच्या दिवशी आरोपी गजानन तक्रारदाराकडे चांदीची कर्णफुलेपरत करण्याच्या बहाण्याने दुकानात आला होता. सोबत खंडागळेही होता. दुकानात शिरल्यावर गजानन यांनी तक्रारदार संदीप यांच्यावर पिस्तूल रोखल्याचे तर खंडागळे यांनी चाकूने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
न्यायालयातील सुनावणी दरम्यान पिस्तूल बनावट असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच तक्रारीत आणि जबाबात चाकूबाबत तफावत दिसून आली होती. संशयित दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याने पोलिसांनी आरोप पत्रात नमुद केले होते. मात्र पुरावा सादर करण्यास तपास यंत्रणेला अपयश आल्यानंतर न्या. शार्मिला पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली.