मडगाव : एटीएम मशिनला स्कीमर बसवून एटीएम कार्ड हॅक करणा-या रामोनिया देशातील पॉल डेनियल वेसील (38) व इमिल सारबु कॉस्तांतिन (32) या दोघांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण गोव्यातील फातोर्डा पोलिसांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. संशयितांनी वापरलेली दोन स्विफ्ट कारही जप्त करण्यात आली आहे. गोव्यात येण्यापूर्वी त्या दोघांचे दिल्ली येथे वास्तव होते तेथेही अशाच प्रकारे गुन्हा केला आहे का याचाही सद्या पोलीस तपास करीत आहेत.सोमवारी रात्री गोव्यातील मडगाव येथील एका इमारतीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात संशयितांनी स्कीमर बसविला होता. बँकेच्या अधिका-यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तात्काळ हे एटीएम मशिन बंद करुन पोलिसांत तक्रार नोंदविली होती. एटीएम केंद्रात बसविलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात संशयितांची छबी टिपली गेली होती. पोलिसांनी या फुटेजची मदत घेउन शोध कार्याला सुरुवात केली होती. मंगळवारी रात्री संशयित डेटा गोळा करण्यासाठी त्या एटीएम केंद्रात आले असता, तेथे दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित पळून गेले. नंतर पोलिसांनी पाठलाग करुन त्या दोघांना जेरबंद केले. दोन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. दोन महिन्यापुर्वी ते गोव्यात आले होते. उत्तर गोव्यातील वागातोर येथे ते रहात होते.
एटीएम कार्ड हॅक करणा-या दोघा रोमानियन नागरिकांना गोव्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 9:25 PM