तुकाराम गोवेकर, मडगाव : येथील न्यू मार्केटमध्ये लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. यात एका कपड्याच्या दुकानाचा समावेश असून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही आग विझवण्यासाठी एकूण पाच बंबाचा वापर करण्यात आला. यात मडगाव, कुंकळ्ळी, कुडचडे, वेर्णा व काणकोण येथून पाच बंब आणण्यात आले, अशी माहिती मडगाव अग्निशमन दलाचे अधिकारी धीरज देसाई यांनी दिली. मार्केटमध्ये जाण्यासाठी रस्ते अरुंद असल्याने पाण्याचे बंब घेऊन जाण्यास अडचण झाली. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्याने अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
घटना सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकलेले नाही, यासाठी आम्ही वीज खात्याला पत्र पाठवून आगीचे कारण समजून घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले अन्यथा संपूर्ण मार्केट जळून खाक झाले असते.
यावेळी उपजिल्हाधिकारी उदय प्रभूदेसाई, पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई, मडगावचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ व नगरसेवक उपस्थित होते.
न्यू मार्केटमधील व्यापारी गोपाळ नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. याबाबत आपण तातडीने अग्निशमन दल व मडगाव पोलिसांना कळवले. घटनास्थळी आमदार दिगंबर कामतही तातडीने हजर झाले. त्यानंतर जवानांनी मोठ्या शर्थीने ही आग आटोक्यात आणली. व्यापारी विराज आमोणकर यांनी न्यू मार्केटमधील सर्व व्यापारी एकसंध असून आम्ही नुकसानग्रस्त व्यापाऱ्यासोबत असल्याचे सांगितले.
उपाययोजनेबाबत पालिका मात्र उदासिन :
मडगावात न्यू मार्केट किंवा गांधी मार्केटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यास हायड्रंट किंवा पाण्याचा वापर करण्यासाठी कोणतीच उपाय योजना नाही. आग लागल्यानंतर केवळ बैठक बोलावली जाते व निर्णय घेतले जातात, त्याचे पुढे काहीच होत नाही. यासाठी पालिकेने सर्तक होण्याची गरज शर्मद पै रायतूरकर यांनी व्यक्त केली.
उपनिरीक्षकांच्या धाडसाला सलाम :
पोलिस उपनिरीक्षक समीर गावकर यांनी आपला जीव धोक्यात घालून शिडीवरून चढून जाऊन दुकानाच्या वर लावण्यात आलेले फलक मोडून काढले. त्यामुळे आगीवर पाण्याचे फवारे मारणे शक्य झाले. त्यांच्या या धाडसाचे सर्वांनी कौतूक केले.
न्यू मार्केट अंधारात :
आग लागण्याची घटना घडल्या नंतर न्यू मार्केटचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व दुकाने बंद करण्यात आली. वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने संपुर्ण न्यू मार्केटमध्ये दिवसाही अंधार पसरला होता.