मडगाव: गोवा राज्यातील दक्षिणोकडील सीमेवरील काणकोण तालुक्यात आज रविवारी पहाटे एका कपडयाच्या दुकानाला आग लागून अंदाजे बारा लाखांची हानी झाली. शनिवारी मडगाव शहरातील लिमरास या कपडयाच्या दुकानाला आग लागल्याने दहा लाखांची मालमत्ता जळाली होती. दोन दिवसांत या जिल्हात आगीच्या दोन घटना घडून त्यात बावीस लाखांची मालमत्ता जळून खाक झाली आहे. आगींच्या या घटना शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त होत आहे.
आज रविवारी चावडी - काणकोण मनोराज दिवा या इमारतीत असलेल्या लक्ष्मी फॅशन गार्मेटस या तयार कपडय़ाच्या दुकानाला आग लागली.काणकोण अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने इतर दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचाविली.
रविवार पहाटे पाचच्या सुमारास दुकानाला आग लागल्याचे येगनेश फर्नाडीस या काणकोण नगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम करणा:या महिलेने पाहिले व नंतर तिने अग्नीशामक दलाला कळविले. त्यानंतर काणकोण अग्नीशामक दलाचे सहाय्यक प्रमुख महादेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दल घटनास्थळी पोहचले. मात्र दुकानाचे शटर बंद असल्याने व आतून आग धुमसत असल्याने लोखंडी सळीचा वापर करुन शटर्स वाकवून पाण्याचा फवारा मारुन आग विझविण्यात आली.
शॉटसर्किटमुळे आगी लागण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. अनेक व्यापारी जीर्ण झालेल्या वीज वायरिंग बदलण्याचा प्रयत्नही करीत नाहीत, त्यामुळे आगी सारख्या दुर्घटना घडत असल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांनी दिली. व्यापा:यांना अशा दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या दुकानातील वीज वायरिंगची तपासणी करुन घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.