म्हापसा : न्यालयालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावरून निराश झालेल्या एका व्यक्तीने गोवा येथील म्हापशातील न्यायालयासमोर आपली दुचाकी पेटवून देण्याचा प्रकार येथे घडला. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारात अन्वर राज गुरू (४०) या कोलवाळ येथील रहिवाशी असलेल्या इसमा विरोधात गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. तसेच प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. कोलवाळवरून म्हापशातील न्यायालयीन जंक्शनवर आल्यावर तिथे त्याने आपल्या नवीन दुचाकीवर पेट्रोल ओतून तीला आग लावली.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठ वर्षांपूर्वी नवीन दुचाकी विकत घेण्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात नोंद झालेला गुन्हा व नंतर दाखल करण्यात आलेल्या खटल्यातील प्रलंबीत प्रकरणाचा राग त्याने आपल्या दुचाकीला पेटवून व्यक्त केला. २००९ साली त्यांनी नवीन दुचाकी विकत घेतली होती. त्याची नोंदणी करण्यासाठी तो एजंट समवेत बार्देस तालुक्यातील साहाय्यक वाहतूक खात्याच्या कार्यालयात गेला होता. नोंदणीसाठी त्याने बोगस मतदान ओळखपत्र दिल्याचा दावा करून खात्याचे तत्कालिन साहाय्यक संचालक नंदकिशोर आरोलकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात त्याच्या तसेच एजंटाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
विविध कारणास्तव मागील आठ वर्षांपासून खटला प्रलंबीत होता. याच वर्षी मे महिन्यात त्याचा निकाल लागून संशयीत व एजंटची न्यायालयाने निर्दोश सुटका केली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी दुचाकीचा ताबा देण्यात आला होता. हा ताबा मिळविण्यासाठी त्याने २२ हजार रुपयांचा वाहतूक कर खात्याच्या तिजोरीत जमा केला होता. घडलेल्या या विविध घटनेतून निराश झालेल्या अन्वर राज गुरू यांनी दुचाकी न्यायालयीन जंक्शनवर नेऊन नंतर तीला आग लावली.