निवृत्ती शिरोडकर
पेडणे : पेडणे पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी कोरगाव येथे कारवाई करत शुभम समरनाथ शर्मा (२७, रा. मुरमुसे तुये) व गोपीनाथ गुणाजी हरमलकर (२५, रा. गावडेवाडा मोरजी) या दोघांना अटक केली. संशयितांकडून विक्रीसाठी आणलेला अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी सांगितले की, कोरगाव येथे बुधवारी रात्री दोघेजण स्कूटरवरून एका ग्राहकाला गांजा देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने तयार केली व कोरगाव येथे पाळत ठेवली. दोघे संशयित आपल्या दुचाकीवरून तेथे आले असता पोलिसांनी तपासणी केली. त्या स्कूटरमध्ये २.५ किलोग्रॅम गांजा आढळला. त्याची बाजारपेठेत किंमत दोन लाख ५० हजार रुपये होते. याप्रकरणात वापरलेली स्कूटर ताब्यात घेण्यात आली. संशयितांवर अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, कॉन्स्टेबल शशांक साखळकर, प्रज्योत मयेकर, निखिल गावस, सचिन गावस, शंकर जल्मी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पेडणेचे पोलिस उपअधिक्षक जीवबा दळवी यांच्यासह उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.