लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : दहा वर्षाच्या कालावधीत मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली भारत देश वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला असून, गोवा राज्याचाही सर्वांगीण कायापलट होत आहे. स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारले जात असून प्रत्येक घरात समृद्धी येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी पालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, राज्याने मोठी उपलब्धी साधताना आत्मनिर्भर गोव्याची वाटचाल पूर्ण यशस्वी केली आहे. सर्वच क्षेत्रात मोदींनी प्रगती साधताना देशाचा विश्वास संपादन केला आहे. सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. महिला कल्याण, किसान, गरीब कल्याण अंतर्गत सर्वच घटकांचा विकास झाला.
केंद्रीय अधिकारी डॉ. पवन कुमार यांनी राज्यात अनेक क्षेत्रांत मोठे बदल घडून आलेले असून, मोठी विकास क्रांती झाल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष रश्मी देसाई यांनी मोदी व डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे विकासाला मोठी चालना मिळाल्याचे स्पष्ट केले
मुलांकडून पथनाट्याचे सादरीकरण, सरकारी अधिकाऱ्यांची विविध दालने
संकल्प यात्रेत मुलांनी पथनाट्य तसेच ढोल वादन करून रंगत आणली. आरोग्य शिबिर तसेच विविध सरकारी योजनांची माहिती व तातडीने विकासच्या योजनांना मंजुरी देणे यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दालने थाटली होती. यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, आरोग्य खात्याचे अधिकारी सरकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.