बेरोजगारी, पाणीप्रश्नी सरकारला अपयश: रमाकांत खलप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 09:34 AM2024-05-06T09:34:57+5:302024-05-06T09:35:47+5:30
मोरजी-मरडीवाडा येथील दाडोबा देवस्थानच्या वर्धापन दिनी खलप यांनी दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : किनारपट्टी परिसरात अनियोजित विकास, स्थानिकांच्या रोजीरोटीवर कुन्हाड, बेरोजगारीचा मुद्दा सोडवण्यास सरकारला गेल्या पाच वर्षांत अपयश आले. तिळारीच्या पाण्याचा योग्य वापर नाही, म्हादाई नदीचे राजकारण केल्याने हातचे पाणी जाण्याची वेळ आणली. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांची भाजपने उपेक्षा केल्याचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमाकांत खलप यांनी सांगितले.
मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ प्रकल्प झाले. मात्र, जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिलाच नाही. तेथे रोजगार संधीही दिल्या नाहीत. या तालुक्यात प्रदूषण विरहित प्रकल्प उभारणे उद्दिष्ट असून, आपण त्यासाठी कार्यरत राहणार, असेही खलप म्हणाले. गेली २५ वर्षे खासदारकी भोगली, मात्र मतदारसंघातील गावांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खलप यांनी केला. मोरजी-मरडीवाडा येथील दाडोबा देवस्थानच्या वर्धापन दिनी खलप यांनी दर्शन घेतले.