मडगाव: एका वर्षापूर्वी आई वडिलांपासून ताटातूट झालेल्या मरियमचा पत्ता गोवा पोलिसांना लागला असला तरी तिच्या आई वडिलांचा नेमका पत्ता कुठे याचा अजूनही ठाव-ठिकाणा लागला नाही.
11 महिन्यापूर्वी या बालिकेचे मडगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म 1 वरुन अपहरण करण्यात आले होते. सदर बालिका आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना रिझवान नावाच्या एका संशयिताने तिचे अपहरण केले होते. तो तिला घेऊन प्रथम मुंबई रेल्वे स्थानकावर व नंतर भोपाळला गेला होता. रिझवानने त्या तीन वर्षीय बालिकेला भीक मागण्याच्या धंद्याला लावले होते. अशाच परिस्थितीत भीक मागताना ती भोपाळ रेल्वे पोलिसांच्या नजरेस पडल्यानंतर तिचा ताबा घेऊन तिची रवानगी तेथील बाल निवारागृहात करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात हाती लागलेल्या संशयिताच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन तब्बल 11 महिन्यानंतर संशयित रिझवान याला मंगळुरु येथून अटक करुन मडगावच्या कोंकण रेल्वे पोलिसांनी गोव्यात आणले. संशयिताने गुन्हय़ाची कबुली दिल्यानंतर त्या बालिकेचा ताबा घेण्यासाठी कोंकण रेल्वे पोलीस भोपाळला गेले होते. मात्र भोपाळ पोलिसांनी बालिकेच्या पालकाविषयी विचारणा करीत या बालिकेचा ताबा गोवा पोलिसांना देण्यास नकार दिल्याने त्यांना परत यावे लागले होते.
अपहरण झालेल्या त्या बालिकेचे पालक पूर्वी हुबळी येथे रेल्वे स्थानकाजवळ राहत होते. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न गोवा कोंकण रेल्वे पोलिसांनी केला होता. मात्र तिच्या पालकांनी आपले वास्तवाचे ठिकाण बदलल्याने अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही.