मडगाव : रविवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीज गुल होण्याची घटना घडली. चारच्या दरम्यान पडलेल्या या पावसानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा वीजपुरवठा सकाळी आठच्या दरम्यान पुन्हा सुरू झाला. वीज खात्याकडे संपर्क साधला असता खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वीजपुरवठा खंडित केला होता, अशी माहिती मिळाली. आकस्मिक पडलेल्या पावसामुळे दक्षिण गोव्यात कुठलीही मोठी हानी झाली नाही. मात्र, घोगळ गृहनिर्माण वसाहतीत एका घरात पाणी शिरण्याची घटना घडली. घोगळ गृहनिर्माण वसाहतीतील एलआयजी १९२ क्रमांकाच्या घरात पाणी शिरले. चेतन निशाद यांच्या मालकीचे हे घर असून पाणी शिरल्यानंतर यासंबंधी मडगाव अग्निशामक दलाला कळविण्यात आले. दक्षिण गोव्यात कुठलीही मोठी हानी घडली नसल्याची माहिती अग्निशामक दलाकडून मिळाली. रविवारी दुपारीही पावसाने हजेरी लावली. फातोर्डा येथील साग मैदानावर विश्व हिंदू परिषदेतर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाला उपस्थित लोकांनी पावसाचा मारा सहन करत भर पावसातही या संमेलनाला उपस्थिती लावली. (प्रतिनिधी)
अवेळी पावसाने मडगावात वीज गुल
By admin | Published: March 02, 2015 1:18 AM