लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : उच्च आणि कमी दाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम विविध मतदारसंघात सुरू आहे. फोंडा तालुका पूर्णपणे भूमिगत वीजवाहिन्यांनी युक्त आणि विजेबाबत सक्षम करण्यासाठी आमच्या खात्याने कंबर कसली आहे. पुढील काही दिवसांत अखंडित वीज मिळेल. ग्राहकाला समस्या उद्भवणार नाहीत, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
बांदोडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वीज खात्याचे अभियंते सुदन कुंकळीकर, मडकई मतदारसंघातील विविध पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री ढवळीकर म्हणाले की, कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात विविध ठिकाणी विजेची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळत असल्याने सर्व कामांना गती मिळाली आहे. मडकई मतदारसंघात एलटी आणि एसटी वीजवाहिन्या टाकण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
फाँडा तालुक्याबरोबरच सावर्डे, सांगे, वाळपई मतदारसंघातही कामे सुरू आहेत. सध्या भूमिगत वीजवाहिन्या तसेच मलः निस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे विविध ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. अशा अनेक रस्त्यांवरील खड्डे दूर करताना हॉटमिक्स डांबरीकरण सुरु येत आहे. फर्मागुढी एक मेगावॅट सोलरवरील वीज प्रकल्पाच्या निर्मितीचे काम सुरू असून, या प्रकल्पामुळे फोंडा तालुक्यातील विजेची समस्या मिटणार आहे, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
एका ग्राहकाने विजेच्या समस्येबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. यावर मंत्री ढवळीकर म्हणाले, याप्रकरणात वीज खात्याची चूक नसून ग्राहकांचीच चूक आहे. गरजेपेक्षा जादा वीज वापरणाऱ्या या ग्राहकासह इतर अनेक ग्राहक सध्या वीज खात्याच्या रडारवर आहेत. गरजेपेक्षा जादा विजेची उपकरणे लावून अतिरिक्त वीज वहन काही ग्राहकांकडून केले जात आहे. त्यामुळे विजेची समस्या उद्भवत आहे.