किशोर कुबल, पणजी : गोवा सागरी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल झाले. विमानतळावर शिष्टाचारमंत्री मॅाविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. गोव्यात नौदलाने आयोजित केलेली ही दोन दिवशीय परिषद उद्या ३१ पर्यंत चालणार आहे. या सागरी परिषदेत ड्रग्स, शस्रास्र तस्करी, पायरसी व आपत्तीकाळातील मदत या विषयांवर चर्चा होणार आहे. राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
सागरी परिषदेची ही चौथी आवृत्ती असून भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. सागरी चिंतनाच्या दिशेने अभ्यास करण्यासाठी ही परिषद बहुराष्ट्रीय व्यासपीठ प्रदान करते. द्वैवार्षिक परिषदा याआधी २०१७, २०१९ आणि २०२१ मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.समकालीन आणि भविष्यातील सागरी आव्हानांना सामोरे जाण्यावर नौदल अधिकारी, सागरी यंत्रणा विचारांची देवाणघेवाण करतील. या परिषदेची संकल्पना आहे. ‘हिंद महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षा’ ही संकल्पना आहे.
भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार तसेच बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया यासह १२ हिंदी महासागरातील तटीय प्रदेशातील नौदल प्रमुख, सागरी दलांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. सागरी धोके आणि आव्हाने एकत्रितपणे कमी करण्यासाठी सागरी धोरण तयार केले जाईल. परिषदेचा भाग म्हणून “मेक इन इंडिया प्रदर्शन” मध्ये भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी उद्योगाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.