केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सहसा कधी कुणावर संतापत नाहीत. त्यांच्याकडून कधी उद्वेग व्यक्त केला जात नाही किंवा चिडचीड, आदळआपटही केली जात नाही. श्रीपादभाऊंच्या याच स्वभावाचा गैरफायदा गोवा सरकार किंवा या सरकारशी निगडित काहीजण घेतात की काय, असा प्रश्न विचारावासा वाटतो. माती मऊ असते, तिथे खोदले जाते अशा अर्थाची म्हण प्रसिद्ध आहे उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे मऊ मनाचे. त्यामुळे त्यांना त्रास दिला जातो, की 'दरवेळी नजरचुकीनेच त्यांच्यावर अन्याय होतो या प्रश्नाचे उत्तर भाजपने व एकूणच गोवा सरकारने शोधण्याची गरज आहे.
दोनापावल येथील जेटीचे दोन दिवसांपूर्वी थाटात उद्घाटन झाले. दोनापावल येथे अत्यंत देखण्या पद्धतीने जेटीचे काम करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या निधीतून हे काम झाले आहे. श्रीपाद नाईक हे मोदी मंत्रिमंडळाचे घटक आहेत. त्यांच्याकडे पर्यटन खाते आहे. ते केंद्रीय राज्यमंत्री व शिवाय उत्तर गोव्याचे खासदार आहेत. निदान केंद्रीय निधीचा वापर ज्या प्रकल्पांसाठी केला जातो, त्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी किंवा पायाभरणीसाठी भाऊंना बोलवायलाच हवे. मात्र गेल्या २५ रोजी जेटीच्या उद्घाटनावेळी त्यांना निमंत्रित केले गेले नाही. ही चूक अधिकाऱ्यांच्या पातळीवरून झाली, की राजकीय नेतृत्वाकडून हा अपराध घडला हे मुख्यमंत्री सावंत शोधून काढू शकतात. मुख्यमंत्र्यांनी विषय गंभीरपणे घ्यावा.
श्रीपाद नाईक यांच्यावर अन्याय होतोय. हे केवळ आजच घडतेय किंवा एकदाच घडलेय असे नाही तर गेल्या वर्षभरात अनेकदा असा अनुभव आलेला आहे. यामुळेच श्रीपाद नाईक आता जाहीरपणे संताप व्यक्त करू लागले आहेत. श्रीपाद नाईक यांना हिंदू बहुजन समाजात अजूनही प्रेमाचे व मानाचे स्थान आहे. श्रीपाद नाईक म्हणजे स्व. मनोहर पर्रीकर नव्हे हे जरी खरे असले तरी, श्रीपादभाऊंचे म्हणून स्वतःचे एक महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्याकडे मानाचे पद आहे आणि लोक त्यांच्यासोबत असल्यानेच ते वारंवार निवडून येत आहेत. प्रत्येक नेता काही पर्रीकर यांच्यासारखा असामान्य होऊ शकत नाही. पण प्रत्येकाचे जे स्थान असते, त्यानुसार मान राखायला हवा. श्रीपाद नाईक यांच्यावर जाहीरपणे बोलण्याची वेळ आली यातून गोवा सरकारची नाचक्की होत आहे. सरकारला श्रीपाद नाईक यांचे काही पडून गेलेले नाही, असा संदेश लोकांमध्ये जात आहे.
जुवारी नदीवरील नव्या केबल स्टेड पुलाच्या एका लेनचे उद्घाटन गेल्या डिसेंबरअखेरीस झाले. त्यावेळीही श्रीपाद नाईक यांना अपमानित करण्यात आले होते. शेवटी त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोन करून श्रीपादभाऊंची समजूत घातली होती. नाईक यांनी त्यावेळीही जाहीरपणे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. जेव्हा केंद्रीय निधीतून प्रकल्प साकारत असतात, तेव्हा तरी सरकारी यंत्रणेला आपला विसर पडू नये ही नाईक यांची भावना योग्य आहे. जेव्हा नाईक गोव्याबाहेर असतात किंवा दिल्लीत असतात तेव्हा त्यांना निमंत्रित करता येत नाही; पण ते जेव्हा गोव्यात असतात तेव्हा त्यांचा मान राखायलाच हवा. गोव्यात गेल्या वीस वर्षांत जे प्रकल्प साकारले त्या प्रकल्पांना गोव्यात आणण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. प्रकल्प मंजूर करून आणण्याच्या प्रक्रियेत श्रीपाद नाईक यांचाही थोडा तरी वाटा आहेच.
भाऊंना निमंत्रित करण्याबाबत पर्यटन खाते कमी पडले. याची जबाबदारी काल अखेर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी घेऊन माफी मागितली हे चांगले केले. पण हा प्रश्न केवळ एका पर्यटन खात्याचा नाही. यापुढे दीड वर्षांत लोकसभा निवडणूक होणार आहे. श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यातून पुन्हा तिकीट मिळू नये म्हणून काहीजण वावरतात. भाऊंच्या मनोधैर्यावर परिणाम करण्याचा प्रयत्न काहीजण करतात. भाऊंवर त्यामुळेच तर अन्याय करण्याची मालिका काहींनी सुरू ठेवलेली नाही ना अशी शंका काहीजण घेतात. इफ्फीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असो किंवा अन्य कोणता राष्ट्रीय सोहळा असो, तिथे भाऊंना भाषण करण्यासाठी निमंत्रित केले जात नाही. अनेकदा निमंत्रण पत्रिकांवर भाऊंचे नाव घातले जात नाही. अन्यायाची ही मालिका यापुढे तरी थांबावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"