लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी त्यांच्या उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील खासदार निधीअंतर्गत प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते यांच्यासोबत बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी या बैठकीत जिल्हाधिकारी आणि उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत उत्तर गोवा जिल्ह्यातील जवळपास २६ विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमध्ये केरी (फोंडा) पंचायत क्षेत्रातील संरक्षक भिंत व परिसराचे सौंदर्गीकरण (३१ लाख), केरी (सातेरी) पंचायत क्षेत्रातील शांतादुर्गा देवस्थानाजवळ अगरशाळेचे बांधकाम (५० लाख), म्हापसा येथील अनंत निकेतन शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम (३२ लाख) रावण (सत्तरी) समाजगृहासाठी शौचालय स्नानगृहाबांधणी (१५ लाख), वाळपई (सत्तरी) येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम ( ७२ लाख), रेवोडा पंचायत क्षेत्रात पथदीप उभारणे (दहा लाख), वळवई (फोंडा) येथे पदपथ आणि सौंदर्गीकरण (३२ लाख), शेटयेवाडा-तोरसे (पेडण) येथे समाजगृहाची बांधणीचा दुसरा टप्पा (४४ लाख), ओल्ड गोवा पंचायत क्षेत्रात बालोद्यानाचा विकास (४४ लाख), साखळी येथील सेंट जॉन क्रॉस हायस्कूलसाठी गेटसह कम्पाउंड वॉल (२३ लाख) यांचा यात समावेश आहे.
याचबरोबर डिचोली येथील झांट्ये महाविद्यालयाच्या स्वतंत्र वाचनालय कक्षाचे बांधकाम (५० लाख), अडवलपाल येथे श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थानजवळ मंडप सभागृहाची बांधणी (८४ लाख), कुंभारखंड, सत्तरी येथे सरकारी प्राथमिक स्कूलसाठी व्यासपीठाचे बांधकाम (२७ लाख), शेळ मेळावली (सत्तरी) येथे जल्मी देवस्थानजवळ समाजगृह बांधणी (३५ लाख), नगरगाव (सत्तरी) येथे पथदीपांची उभारणी (२६ लाख), कुडणे (डिचोली) येथे समाजगृहाची बांधणी (२७ लाख), हळदोण्यातील किटला येथे स्मशानभूमीसाठी कम्पाउंड वॉल आणि शेडची बांधणी (७३ लाख), माडेल, चोडण येथे समाजगृहाची बांधणी (१ कोटी, ४५ लाख), लाटंबार्से (डिचोली) येथे सातेरी देवस्थानजवळ समाजगृहाची बांधणी (१६ लाख), नगरगांवमधील नानोडा पंचायत क्षेत्रातील हनुमान देवस्थानजवळ समाजगृहाची बांधणी (७८ लाख), पेडणेतील भदोलवाडा येथील महापुरुष संस्थानजवळ समाजगृहाची बांधणी (११ लाख), करमळी येथील विकास नगर येथे खुल्या जागेचा विकास (४५ लाख), पेडणेतील गावडेवाडा येथील सेंट जोसेफ चर्चच्या स्मशानभूमीत डांबरी रस्ता व कबरींचे बांधकाम (८ लाख), पाजवाडा-डिचोली येथे दफनभूमीचे बांधकाम (२१ लाख), मांद्रे शिक्षण संस्थेसाठी शाळा इमारत बांधकामाचा (४२ लाख) समावेश आहे.