- सुशांत कुंकळयेकर, बाणावली (मडगाव, गोवा)
भारत-रशिया द्विराष्ट्रीय शिखर बैठकीत शनिवारी सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे चर्चेत आला. सीमेपलीकडील दहशतवाद रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रे कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिली. दहशतवाद हा जागतिक मुद्दा बनला असून कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा दिला जाणार नाही, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली.तीन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर हे दोन्ही नेते संयुक्त निवेदनासाठी माध्यमांसमोर आले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात रशियातील एका म्हणीचा आधार घेत, ‘दोन नव्या मित्रांपेक्षा जुना मित्र उत्तम’ असे प्रतिपादन करून भारत व रशिया यांची मैत्री दीर्घकाळाची असल्याची आठवण दिली. दोन्ही देश एकमेकांच्या हितसंबंधांना कधीही बाधा आणणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद रोखण्यासाठी भारत व रशिया या दोन्ही देशांची भूमिका एकच असल्याचे पुतीन यांनी सांगितले. शनिवारी सुमारे तीन तास ही शिखर बैठक झाल्यानंतर दोन्ही नेते एकत्रित माध्यमांना सोमोरे गेले. या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या.पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी, उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल रशियन अध्यक्ष पुतीन यांनी तीव्र खेद व्यक्त केल्याचे सांगितले. दहशतवाद हा केवळ भारताला सतावणारा प्रश्न नाही. दहशतवादाचा केंद्रबिंदू भारताजवळ असला, तरी त्याचे परिणाम जागतिक आहेत, असे जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.पुतीन यांचे वक्तव्यरशिया-पाक यांच्यात झालेल्या कवायतींच्या पार्श्वभूमीवर रशियाची भूमिका काय असेल, याबद्दल सर्वांना उत्सुकता असताना रशियाने ही भूमिका जाहीर केली. दहशतवादाविरोधात भारत व रशिया यांची भूमिका एकच असल्याचे पुतीन म्हणाले.