लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे यांनी काल अर्ज दाखल केला. मात्र, या निवडणुकीतून विरोधी पक्षानी माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत आपला उमेदवार जिंकू शकत नाही, याची कबुलीही विरोधकांनी दिल्यामुळे तानावडे यांची निवड बिनविरोध होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
सदानंदशेट तानावडे यांचे नाव राज्यसभेसाठी काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले होते. केवळ अर्ज दाखल करण्याचे बाकी होते. मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभा सचिवांच्या कार्यालयात आले तेव्हा त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत, दाजी साळकर व इतर नेते मंडळी होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सदानंद तानावडे यांना शुभेच्छा दिल्या. गोव्यातून भाजपचा विजय निश्चित आहेच, शिवाय राज्यसभेतही भाजप खासदारांची संख्या वाढत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तानावडे यांनी आपल्याला राज्यसभा खासदारकीची उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे हायकमांड तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजपचे आभार मानले.
गोव्याच्या हितासाठी...
काल सायंकाळी विरोधी आमदार युरी आलेमाव, विजय सरदेसाई, वेन्झी व्हिएगश, वीरेश बोरकर, कार्लस फेरेरा, एल्टन डिकॉस्टा व कुझ सिल्वा यांची बैठक झाली. आज सायंकाळी त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले. गोव्याच्या हितासाठी आम्ही राजकीय रणनीती ठरवली व राज्यसभा निवडणूक लढवायची नाही, असे ठरवले आणि विरोधी आमदारांनी तसे जाहीर केले. यामुळे तानावडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.