नारायण गावस
पणजी: राज्यात आताच कुठेतरी स्थानिक आंब्याची आवक वाढली होती पण शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदा आंबा पीक नुकसानीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा अगोदरच काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे त्यात आता आंब्याचा पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त असून कृषी खात्याने आर्थिक सहाय करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडू्न केली जात आहे. राज्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकायला आलेला आंबा वादळी वाऱ्याने झडला. तसेच काजू पिकावरही याचा परिणाम झाला. माेठ्या प्रमाणात कच्चे आंबेही पडल्याने आंबा उत्पादकांना नुकसान झाले.
सध्या मे महिना सुरु असल्याने मानकुराद तसेच हापूस आंबे पिकायला आले आहेत. अनेक आंबाउत्पादकांनी ते काढून पिकायला घातले आहे. तर अनेक आंबे हे झाडावरच होते पण अवकाळी पावसामुळे या आंब्याचे पीक झडले आहे. या वर्षी अगोदर आंबे पीक हे कमी होते त्यात आता हा निसर्गकडून नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते. त्याला दरही ५०० ते ७०० डझन पर्यत मिळत होता. पण शनिवारी झालेल्या वादळी पावसाने आंबा गळून पडल्याने ते कुजले आहेत. त्यामुळे आंब्याचे नुकसान यंदा सहन करावे लगणार आहे. त्यामुळे कृषी खात्याने नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.
केपेचे शेतकरी उल्हास वेळीप म्हणाले यंदा हवामानाचा फटका बसल्याने काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. आंबा लागवडही यंदा कमी झाली होती. त्यात आता हा अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागायतीत असलेले मानकुराद आंबे पावसामुळे कुजले आहेत. आणखी पुढील १५ दिवस तरी पाऊस नसला तर हे आंबे आम्हाला मिळू शकतात.