नारायण गावस
पणजी: राज्यात शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाचा आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे. नुकतेच पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वादळी वाऱ्याने गळून पडले आहेत. तर काही आंबे पावसामुळे कुजले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचे पिकायला आलेले आंबे पाऊस तसेच वाऱ्याने झडले यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वर्षी अगोदरच आंब्याचे उत्पादन खूप कमी आहे. तसेच उशीरा उत्पादन झाले आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक मानकुराद आंबा दाखल झालेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा बाहेरुन आयात केला जातो. आताच कुठेतरी बागायतीमध्ये आंबा पिकायला सुरुवात हाेणार होती. लाेक आता आंबे काढून पिकायला घालणार होते. पण त्या अगोदरच पाऊस आल्याने झाडावरील आंबे झडले तसेच ते कुजून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
राज्यात अजून गेल्यावर्षीप्रमाणे आंबा दाखल झाला नसल्याने मानकुराद आंब्याचा दर ८०० ते १ हजार पर्यंत आहे. तर हापूस ६०० रुपये डझनने विकला जात आहे. पण या वर्षी लागवड तसेच आवक कमी असल्याने किमती खाली येणार नाही. असे काही आंबा उत्पादक सांगत आहेत. तरीही राज्यात उत्पादन वाढत आहे.
सत्तरीतील आंबा उत्पादन शेतकरी यशवंत सावंत म्हणाले, आमच्या आंब्याच्या बागायतीमध्ये आताच कुठेतरी आंबे पिकायला आले होते. पुढील आठवड्यात हे आंबे काढून पिकायला घातले जाणार होते. पण शनिवारी अवकाळी पाऊस झाल्याने झाडावरील कच्चे आंबे झडले. यावेळी आता ते कुजण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा आम्हाला फटक बसला आहे. अगाेदरच या वर्षी आंब्याची लागवड कमी आहे त्यात आता ही नुकसान झाली आहे.
कृषी संचालक नेविल अल्फान्सो म्हणाले, या वर्षी आंब्याच्या हंगामाला उशीर झाला आहे. एकंदरीत वेळ पाहता यंदा बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होणे गरजेचे होते. आंब्याच्या लागवडीस उशीर झाल्याने या वर्षी आंब्याचे उत्पादनात घट होऊ शकते. पण अजून पुढील मे महिना आहे. अवकाळी पाऊस झाला नाही शेतकऱ्यांना आंब्याचे पीक घेता येईल.